बंगळुरू FIR Against Nirmala Sitharaman : निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून कॉर्पोरेट कंपन्यांकडून हजारो कोटी रुपयांची उधळपट्टी केल्याप्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि इतरांविरुद्ध टिळकनगर पोलीस ठाण्यात (Tilak Nagar Police Station) एफआयआर दाखल करण्यात आलाय. शहरातील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली आहे.
कारवाई करण्याचे दिले निर्देश : जनाधिकार संघर्ष परिषदेचे (जेएसपी) सह-अध्यक्ष आदर्श अय्यर यांनी बेंगळुरू येथील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण आणि इतरांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. अय्यर यांनी इलेक्टोरल बाँडद्वारे ८,००० कोटी रुपये गोळा करून बेकायदेशीर कृत्य केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या न्यायालयाने शुक्रवारी टिळक नगर पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले होते.
खंडणीच्या आरोपाखाली एफआयआर दाखल : निर्मला सीतारमण यांच्यावर गुन्हेगारी कट आणि खंडणीच्या आरोपाखाली एफआयआर दाखल करण्यात आलाय. तसेच, भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कटील, भाजपा प्रदेशाध्यक्ष बीवाय विजयेंद्र आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) अधिकारी आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
राजकीय फायद्यासाठी ईडीचा वापर : आदर्श आर अय्यर यांनी तक्रारीत म्हटलं की, "अंमलबजावणी संचालनालयाचा वापर करून, देशातील कॉर्पोरेट कंपन्यांवर छापे टाकण्यात आले आणि निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून 8,000 कोटी रुपयांपर्यंतची रक्कम वसूल करण्यात आली. राजकीय फायद्यासाठी ईडीचा वापर करून कंपन्यांवर हल्ले झाले, सीईओ आणि एमडींना अटक करण्यात आली. अटकेच्या भीतीमुळं कंपनी मालकांना इलेक्टोरल बाँड्स खरेदी करणं भाग पडलं आहे."
तक्रारीत काय आहे? : "एप्रिल 2019 ते ऑगस्ट 2022 आणि नोव्हेंबर 2023 पर्यंत कॉर्पोरेट ॲल्युमिनियम आणि कॉपर दिग्गज एमएस स्क्वेअर लाइट आणि वेदांत कंपन्यांकडून एकूण 230.15 कोटी रुपये मिळाले. सर्व आरोपींनी अरविंदा फार्मा कंपनीच्या 49.5 कोटी रुपयांसह सुमारे 8 हजार कोटी रुपये गुप्तपणे निवडणूक रोख्यांमध्ये रूपांतरित केले. याप्रकरणी आरोपींवर कारवाई करावी," असे अय्यर यांनी तक्रारीत म्हटलं आहे.
हेही वाचा -
"तरुणांनो गाव सोडा आणि शहरात हमाली करा"; अर्थसंकल्पावर शेतकरी नेत्यांची टीका - Budget 2024
अर्थसंकल्प सादर होताच शेयर बाजार ढासळला; काय आहेत नेमकी कारणं? - Budget Impact on Share Market