हैदराबाद Lok Sabha Election Exit Poll 2024 : लोकसभा निवडणूक 2024 साठी मतदान पूर्ण झालं आहे. आता एक्झिट पोलचे निकाल समोर येत आहेत. लोकसभा निवडणूक 2024 च्या प्रत्यक्ष निकालापूर्वी निवडणूक आयोगानं अट घातल्यानंतर आज संपूर्ण मतदान संपताच एक्झिट पोलचे अंदाज येऊ लागले आहेत. निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागणार आहे. मात्र त्याआधीच आज वेगवेगळ्या एजन्सींनी आपले एक्झिट पोल जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. इंडिया टुडे-माय ॲक्सिसनेही एक्झिट पोल जारी केला आहे. आतापर्यंतच्या सर्वेक्षणानुसार तामिळनाडूमध्ये 22 टक्के मतांसह एनडीएला 2 ते 4 जागा मिळू मिळण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय. तर इंडिया आघाडीला 33 ते 37 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसंच इतरांनाही 2 जागा मिळण्याची शक्यता असल्याचं त्यांनी एक्झिट पोलमध्ये म्हटलं आहे.
- इंडिया टुडे-माय ॲक्सिसच्या सर्वेक्षणात कर्नाटकात भाजपासह एनडीएचा एक्झिट पोल समोर आला आहे. एक्झिट पोलनुसार राज्यात एनडीएला 23 ते 25 जागा मिळू शकतात. याशिवाय काँग्रेसला केवळ 3 ते 5 जागां मिळण्याचा त्यांनी अंदाज वर्तवला आहे. तामिळनाडूमध्ये एनडीएला 22 टक्के मतांसह 2 ते 4 जागा मिळू शकतात. येथे प्रथमच भाजपाचं खातंही उघडलं जाऊ शकतं, असा अंदाज आहे.
- स्कूल ऑफ पॉलिटिक्सने निवडणुकीदरम्यान केलेल्या सर्वेक्षणात 20 लाखांहून अधिक लोकांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक लोकसभेतील किमान 3 हजार लोकांकडून त्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आपण एक्झिट पोलच्या निकालांवर नजर टाकल्यास भाजपाला 2019 च्या तुलनेत फायदा होण्याचा अंदाज वर्तवला आहे. स्कूल ऑफ पॉलिटिक्सच्या एक्झिट पोलनुसार, भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला ४९.३ टक्के मते मिळत आहेत. तेथे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीला ३८.४ टक्के मत मिळण्याचा अंदाज आहे. तसंच इतरांना 12.3 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.
- युतीबाबत बोलायचं झालं तर एनडीए दोन तृतीयांश बहुमतानं सरकार स्थापन करण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. एनडीएला 367-403 जागा मिळताना पोलमध्ये दिसत आहेत. त्याच वेळी, इंडिया आघाडीला 129-161 जागांवर समाधान मानावं लागू शकतं. इतरांना फक्त 7-18 जागा मिळत आहेत.
कोणत्या पक्षाला किती जागा? : एक्झिट पोलच्या अंदाजानुसार एकट्या भाजपला 318-342 जागा मिळताना दिसत आहेत. काँग्रेसला केवळ 53-66 जागांवर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे. त्याचवेळी पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर निवडणूक लढणाऱ्या टीएमसीला १९-२३ जागा मिळत आहे, असं एक्झिट पोलमध्ये दिसून येत आहे. द्रमुकचीही स्थिती अशीच आहे. त्यांना 18-22 जागा मिळण्याची शक्यता आहे. टीडीपीला 13-16 जागा मिळताना दिसत आहेत.
यूपीमध्ये भाजपा मजबूत : एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, देशातील सर्वात मोठं राज्य उत्तर प्रदेशमध्ये एनडीएला 58-66 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसंच इंडिया आघाडीला इथं केवळ 14-22 जागांवर समाधान मानावं लागणार आहे. दिल्लीतील सातही जागांवर भाजपाचा विजय दिसून येत आहे. त्याचबरोबर हरियाणात भाजपाला 8-9 जागा मिळू शकतात. तसंच इंडिया आघाडीला केवळ 1-2 जागा मिळण्याची शक्यता आहे.
बिहार-बंगालचीही काय आहे स्थिती : पश्चिम बंगालमध्ये भाजपाला मोठ्या आशा आहेत. मात्र, या निवडणुकीतही भाजपा चांगली कामगिरी करताना दिसत आहे. तिथं त्यांना 19-23 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, टीएमसीची स्थिती खराब असल्याचं दिसतंय. बिहारमध्ये भाजप-जेडीयू युती 2019 च्या कामगिरीची पुनरावृत्ती करताना दिसत आहे. त्यांना 37-39 जागा मिळताना दिसत आहेत. त्याच वेळी, आरजेडीच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीला केवळ 0-3 जागांवर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे. इतरांना 0-2 जागा मिळू शकतात.
महाराष्ट्रासह गुजरातमध्येही भाजपाला यश : महाराष्ट्रात एनडीएला 31-35 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसंच विरोधी इंडिया आघाडीला केवळ 12-16 जागांवर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये 2019 ची भाजप पुन्हा पुनरावृती करताना दिसत आहे. 26 पैकी 26 जागांवर भाजपाला तिथ विजय अपेक्षित आहे. राजस्थानबद्दल बोलायचं झालं, तर येथे भाजपला 23-25 जागा मिळताना दिसत आहेत. छत्तीसगडमध्ये भाजपच्या खात्यात 10-11 जागा जाण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशात भाजपला 28-29 जागा मिळू शकतात. इथं इंडिया आघाडीला म्हणजेच काँग्रेसला 0-1 जागांवर समाधान मानावं लागेल.
हे वाचलंत का :
- भारतातील 'एक्झिट पोल'चा इतिहास काय रं भाऊ? 'एक्झिट पोल' कसा करतात? वाचा A टू Z माहिती - Lok Sabha Election 2024 Exit Polls
- राज्यातील 48 मतदारसंघांत कोण मारणार बाजी? तुमच्या भागाचा कोण खासदार? जाणून घ्या 'ईटीव्ही भारत'चा खास रिपोर्ट - Lok Sabha Election 2024
- जयंत पाटील काँग्रेसमध्ये जाणार; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा दावा, भाजपानंही भरली हवा - Jayant Patil Congress Joins