कोईम्बतूर- लोकसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्यानं सर्वच राजकीय पक्षांमध्ये वरिष्ठ नेत्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तिकीट न मिळाल्यानं राजकीय नेते कधी पक्ष बदलून तर कधी वक्तव्य करून आपल्याच पक्षाविरोधात नाराजी व्यक्त करतात. मात्र, तामिळनाडूमध्ये विद्यमान खासदारानं तिकीट वाटपात डावलल्यानं धक्कादायक पाऊल उचलल्याची चर्चा आहे.
तामिळनाडू येथील इरोडे या लोकसभा मतदारसंघाचे खासदार गणेशमूर्ती यांचा आज पहाटे पाच वाजता मृत्यू झाला. कथित आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांचे ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याचं रुग्णालयानं म्हटलं आहे. इरोडे एमडीएमकेचे खासदार गणेशमूर्ती यांनी कथित आत्महत्येचा रविवारी प्रयत्न केला. त्यानंतर त्यांच्या खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.
राजकीय पक्षांच्या नेत्यांना धक्का- गणेशमूर्ती हे २०१९ मध्ये इरोडे या मतदारसंघामधून निवडून आले होते. मात्र, यंदा त्यांना पक्षाकडून लोकसभेचे तिकीट मिळाले नव्हते. त्यामुळे ते निराश होते, अशी चर्चा आहे. त्यांनी रविवारी ( २४ मार्च) कथित आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. एमडीएमकेच्या हायकंमाडनं तिकीट नाकारल्यानंतर इरोडचे खासदार ए. गणेशमूर्ती हे तणावात होते. त्यांची प्रकृती काय आहे हे सांगण्यास दोन दिवस लागतील, असे डॉक्टरांनी सांगितलं होते. मात्र, उपचार सुरू असतानाच खासदार गणेशमूर्ती यांचे निधन झाल्यानं तामिळनाडूत राजकीय पक्षांच्या नेत्यांना धक्का बसला आहे.
नेमकं काय घडले? गणेशमूर्ती यांनी 24 मार्च रोजी सकाळी कथित आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. उलट्या झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी खासदार गणेशमूर्तींना रुग्णालयात दाखल केले. गणेशमूर्ती यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात दिली.
तिकीट कापून आमदारकीची देण्यात येणार होती संधी- नुकतेच माध्यमांशी बोलताना एमडीएमकेचे नेते वायको यांनी गणेशमूर्तींच्या लोकसभा तिकिटाबाबत भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, गणेशमूर्ती हे 3 वेळा संसदेत निवडून आले. त्यांनी खासदार म्हणून आपलं कर्तव्य चोखपणं बजावले. यावेळी पक्षातील ९९ टक्के लोकांनी मतदान करून दुरई वायको यांना संसदेत पाठवा, असे सांगितले. त्यामुळे गणेशमूर्ती यांना पुढील विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून संधी मिळू शकते.
आत्महत्या हा उपाय नाही- जर तुमच्या मनात आत्महत्येचे विचार येत असतील, किंवा एखाद्या मित्राबद्दल काळजी वाटत असेल किंवा तुम्हाला मानसिक-भावनिक आधाराची गरज असेल, तर मानसिक समुपदेशकांचा सल्ला घ्या. अथवा स्नेहा फाउंडेशन - 04424640050 (24x7 उपलब्ध) किंवा iCall, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसची हेल्पलाइन - 9152987821 वर कॉल करा. या क्रमांकावर सोमवार ते शनिवार सकाळी 8 ते रात्री 10 या वेळेत तुमचे म्हणणे ऐकून घेतले जाते.
हेही वाचा-