नवी दिल्ली ED Raid On Aap Leaders : दिल्लीतील दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीनं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अनेक समन्स बजावले असून त्यांना चौकशीसाठी बोलावलंय. मात्र आजपर्यंत ते चौकशीला हजर झाले नाहीत. मंगळवारी, ईडीनं या प्रकरणी दिल्ली एनसीआरमध्ये डझनहून अधिक ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. ईडीनं आम आदमी पार्टीचे खासदार तसेच मुख्यमंत्र्यांच्या खासगी सचिवांच्या घरावर छापे टाकले आहेत.
धमकावण्यासाठी केलं जात असल्याचा आरोप : आम आदमी पार्टीच्या नेत्या आणि दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी यांनी आजच्या ईडीच्या छाप्याबद्दल सांगितलं की, "हे केवळ धमकावण्यासाठी केलं जात आहे. पार्टीने एक दिवस आधीच सांगितलं होतं की, मंगळवारी सकाळी 10 वाजता ते ईडीविरोधात मोठा खुलासा करणार आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांना ही पत्रकार परिषद कोणत्या मुद्द्यावर होणार हे जाणून घ्यायचं होतं. मात्र त्यांना माहिती मिळाली नाही. त्यामुळे आज हा मुद्दा वळवण्यासाठी आमच्या पार्टीच्या नेत्यांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले."
12 ठिकाणी एकाच वेळी छापे : मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात ईडीची टीम सकाळी आम आदमी पार्टीचे नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य एनडी गुप्ता यांच्या अधिकृत निवासस्थानी पोहोचली. तसेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे खासगी सचिव विभव कुमार यांच्या घरावरही ईडीच्या पथकानं छापे टाकले. दिल्ली जल बोर्डाचे माजी सदस्य शलभ कुमार यांच्या घरावरही ईडीचा छापा पडला. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली एनसीआरमध्ये जवळपास 12 ठिकाणी एकाच वेळी ईडीच्या रेड पडल्या. ईडी यामध्ये दारू घोटाळ्यापासून दिल्ली जल बोर्ड घोटाळ्यापर्यंतच्या प्रकरणांचा तपास करत आहे.
एनडी गुप्ता आणि बिभव कुमार यांची चौकशी : खासदार एनडी गुप्ता हे सुरुवातीपासूनच आम आदमी पार्टीशी संबंधित असून ते व्यवसायानं चार्टर्ड अकाउंटंट आणि पार्टीचे खजिनदार आहेत. आम आदमी पार्टीच्या निधीची कामं त्यांच्याच देखरेखीखाली केली जातात. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सचिव बिभव कुमार यांचीही ईडीनं चौकशी केली आहे. यापूर्वी गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये ईडीनं बिभव यांना चौकशीसाठी नोटीस दिली होती आणि त्यानंतर त्यांना कार्यालयातही बोलावलं होतं.
हे वाचलंत का :