दुर्ग/रायपुर (छत्तासगड) Durg Accident : छत्तीसगडमध्ये एक भीषण अपघात झालाय. मंगळवारी रात्री दुर्ग जिल्ह्यात कर्मचाऱ्यांनी भरलेली एक बस 40 फूट खोल खड्ड्यात पडली. या अपघातात 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तर अनेक जण जखमी झाले आहेत. या अपघातानंतर संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हे कर्मचारी एका खासगी कंपनीत काम करायचे. अपघातानंतर या कंपनीनं मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपये, एका सदस्याला नोकरी आणि जखमींचा संपूर्ण खर्च उचलण्याचं आश्वासन दिलंय. या अपघातावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी अणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी शोक व्यक्त केलाय.
राष्ट्रपतींकडून दुःख व्यक्त : या अपघातावर राष्ट्रपतींनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय, "छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात झालेल्या बस अपघातात अनेकांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. सर्व शोकग्रस्त कुटुंबियांना माझ्या मनापासून संवेदना. जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी प्रार्थना."
पंतप्रधानांनी केलं दुःख व्यक्त : या अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केलाय. त्यांनी एक्स मीडियावर पोस्ट करुन म्हटलं की, "दुर्ग, छत्तीसगडमध्ये झालेला बस अपघात अत्यंत दुःखद आहे. यात, ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याबद्दल माझ्या शोकसंवेदना व्यक्त करतो. जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन हे पीडितांना सर्वतोपरी मदत करत आहे."
मुख्यमंत्री काय म्हणाले : छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनीही याबद्दल शोक व्यक्त केला आहे. एक्स मीडियावर पोस्ट करताना म्हटले की, "दुर्ग येथील कुम्हारीजवळ एका खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी भरलेल्या बसचा अपघात झाल्याची दुःखद माहिती मिळालीय. मृतांच्या आत्म्याला शांती आणि शोकाकुल कुटुंबीयांना बळ देवो, अपघातात जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या उपचारासाठी योग्य व्यवस्था करण्यात आलीय, ते लवकरात लवकर बरे व्हावे अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो."
कुठं झाला अपघात : प्राप्त माहितीनुसार, छत्तीसगडच्या कुम्हारी येथील खापरी रोडवरील मुरुम खाणीजवळ हा अपघात झाल्याचं समोर आलंय. एका कंपनीचे कर्मचारी प्लांटमधून काम करुन बसनं परतत होतं. यादरम्यान बसचं नियंत्रण सुटल्यानं 40 फूट खोल दरीत कोसळली. हा अपघात झाला तेव्हा बसमध्ये 40 कर्मचारी होते. अपघातानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी म्हटलंय.
हेही वाचा :