नवी दिल्ली Delhi CM Atishi : लडाखला विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी सोनम वांगचूक (Sonam Wangchuk Police Detained) यांनी केली. या मागणीसाठी लडाख ते राजघाट अशी पदयात्रा सोनम वांगचूक यांनी काढली. मात्र, पोलिसांनी दिल्लीजवळील सिंघू सीमेवर त्यांना रोखत ताब्यात घेतलं. त्यानंतर वांगचूक यांना भेटण्यापासून दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना दिल्ली पोलिसांनी रोखलं होतं. बवाना पोलीस स्टेशनमध्ये त्या दाखल झाल्या होत्या.
लोकशाहीची हत्या : मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री आतिशी या बवाना पोलीस स्टेशनच्या आत गेल्या, त्यांना सोनम वांगचूक यांच्याशी बोलायचं होतं. मात्र, पोलिसांनी त्यांना ना त्यांच्याशी बोलू दिलं, ना भेटू दिलं. यानंतर आतिषी पोलीस स्टेशनच्या बाहेर आल्या आणि त्यांनी "ही थेट लोकशाहीची हत्या" असल्याचं म्हटलं.
गांधी समाधीचं दर्शन घेणं चुकीचं आहे का? : "सोनम वांगचूक आणि 150 लडाखी बंधू-भगिनी शांततेत दिल्लीत येत आहेत. पोलिसांनी त्यांना अडवलं. सोमवारी रात्रीपासून सर्वजण बवाना पोलीस स्टेशनमध्ये कैद आहेत. लडाखसाठी लोकशाही हक्क मागणं चुकीचं आहे का? 2 ऑक्टोबर रोजी सत्याग्रहींनी गांधी समाधीचं दर्शन घेणं चुकीचं आहे का?" असा सवाल मुख्यमंत्री आतिशी यांनी केंद्र सरकारला विचारलाय.
भाजपाची हुकूमशाही : "सोनम वांगचूक यांना रोखणं म्हणजे हुकूमशाही आहे. लडाखच्या जनतेला राज्याचा दर्जा हवा आहे. बापूंच्या समाधीकडं जाणाऱ्या सोनम वांगचूक आणि लडाखच्या लोकांना अटक करण्यात आली. त्यांनी (दिल्ली पोलीस) मला सोनम वांगचूक यांना भेटू दिलं नाही. ही भाजपाची हुकूमशाही आहे. आम्ही सोनम वांगचूक यांना पाठिंबा देतो," असं म्हणत आतिशी यांनी जोरदार टीका केली.