नवी दिल्ली Swati Maliwal Assault Case : आम आदमी पार्टीच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांना 13 मे रोजी झालेल्या कथित मारहाण प्रकरणी दिल्ली पोलिसांनी रात्री उशिरा एफआयआर नोंदवला. यामध्ये केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांच्यावर मारहाणीचा आरोप करण्यात आला. स्वाती मालीवाल यांनी बिभवनं त्यांना चापट, लाथा मारुन अंगावर वार केल्याची माहिती दिल्याचं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान या प्रकरणी बिभव कुमार यांना महिला आयोगानं नोटीस जारी करत शुक्रवारी चौकशीला हजर राहण्याचं समन्स बजावलं आहे.
स्वाती मालीवाल यांच्या घरी जाऊन नोंदवला जबाब : गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास दिल्ली पोलिसांचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रमोद सिंह कुशवाह आणि उत्तर जिल्ह्याच्या महिला अतिरिक्त पोलीस उपायुक्त या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वाती मालीवाल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा जबाब नोंदवला. या दोन अधिकाऱ्यांनी तब्बल 4 तास चौकशी करुन त्यांचा जबाब नोंदवला. त्यानंतर दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची या प्रकरणी बैठक घेतल्यानंतर रात्री उशिरा एफआयआर नोंदवण्यात आला.
स्वाती मालीवाल यांनी केला होता 112 क्रमांकाला फोन : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी स्वाती मालीवाल यांना कथित मारहाण झाल्यानंतर त्यांनी 112 क्रमांकावर कॉल केला. त्यानंतर त्यांनी दिल्लीतील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी दाखल झाल्या. मात्र त्यांनी तक्रार दाखल न करताच पोलीस ठाण्यातून परत जाणं पसंद केलं. आपण दोन ते तीन दिवसात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती स्वाती मालीवाल यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिली. स्वाती मालीवाल यांनी पीसीआर कॉल करुन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे खासगी सचिव बिभव कुमार यांनी मुख्यमंत्री निवासस्थानात कथित मारहाण केल्याचा आरोप केला. या हायप्रोफाईल प्रकरणामुळे दिल्ली पोलिसांचे उच्च अधिकाऱ्यांनी या प्रकरणात जातीनं लक्ष घातलं. उत्तर जिल्हा पोलीस उपायुक्त एम के मीना यांनी स्वाती मालीवाल या पोलीस ठाण्यात आल्या, मात्र त्यांनी तक्रार न करता परत गेल्या, अशी माहिती दिली.
कथित मारहाणीच्या तीन दिवसांनी पुढं आल्या स्वाती मालीवाल : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पिएनं कथित मारहाण केल्यानंतर तीन दिवसांनी स्वाती मालीवाल पुढं आल्या. त्यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली. यात त्यांनी "माझ्यासोबत घडले ते खूप वाईट होतं. माझ्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती मी पोलिसांना दिली आहे. पोलीस योग्य ती कारवाई करतील अशी मला आशा आहे. हे दिवस माझ्यासाठी खूप कठीण होते. ज्यांनी मला पाठबळ दिलं, त्यांचे मी आभार मानते. माझं चारित्र्य हनन करण्याचं काम ते दुसऱ्यांच्या सांगण्यावरून करत आहेत," असं त्यांनी नमूद केलं आहे.
महिला आयोगानं बजावलं समन्स : आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पिएनं कथित मारहाण केल्यानं मोठी खळबळ उडाली. याप्रकरणी भिभव कुमार यांना राष्ट्रीय महिला आयोगानं समन्स बजावले आहेत. शुक्रवारी सकाळी 11 या प्रकरणी सुनावणी होणार आहे.
हेही वाचा :
- DCW Chief On Rape Victim : दिल्लीचे पोलीस आहेत की गुंडांचे सहकारी? स्वाती मालीवाल कडाडल्या, बलात्कार पीडितेला भेटण्यापासून रोखलं
- Manipur Violence: दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुखांना मणिपूर सरकारने नाकारली परवानगी.. नियोजनाप्रमाणे दौरा करण्याचा निर्धार
- DCW Chief Swati Maliwal : माझ्या वडिलांनीच केले माझे लैंगिक शोषण, दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांचा मोठा खुलासा