नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ईडीनं नवव्यांदा मुख्यमंत्री केजरीवाल यांना समन्स पाठविलं आहे. सूत्राच्या माहितीनुसार ईडीनं आपच्या संयोजकाविरोधात नव्यानं गुन्हा दाखल केला. त्यामुळे आपकडून आज ईडीच्या कारवाईविरोधात पत्रकार परिषद घेतली जाणार आहे.
दिल्ली दारू घोटाळा प्रकरणाची चौकशी करणाऱ्या ईडीनं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 21 मार्चला चौकशीसाठी मुख्यालयात बोलाविलं आहे. याआधी ईडीनं 8 समन्स पाठवले आहेत. ईडीनं वारंवार समन्स पाठवूनही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे चौकशीला हजर राहिले नाहीत. या प्रकरणात मुख्यमंत्री केजरीवाल यांना शनिवारी राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर राहावं लागलं. न्यायालयानं केजरीवाल यांना जामीन मंजूर केला असून पुढील सुनावणी 1 एप्रिल रोजी होणार आहे. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर ईडीकडून केजरीवाल यांना अटक करण्याचा प्रयत्न असल्याचा आम आदमी पक्षानं यापूर्वी आरोप केला.
आपच्या आमदारांना २५ कोटींची ऑफर- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 18 फेब्रुवारी रोजी भाजपावर गंभीर आरोप केला. भाजपाकडून इतर पक्षांचे नेते आणि आमदार फोडण्यात येत असल्याचा केजरीवाल यांनी आरोप केला. त्यांनी म्हटले, "' भाजपामध्ये सगळे का जात आहेत? ईडी आणि पीएमएलए रद्द केला तर निम्म्यांहून अधिक लोक भाजपा पक्ष सोडून जातील. भाजपानं ईडी आणि पीएमएलएची भीती दाखवणे बंद केले तर भाजपाचे निम्मे नेते पक्ष सोडतील. भाजपाच्या नेत्यांनी आपच्या आमदारांना २५ कोटींची ऑफर दिल्याचाही केजरीवाल यांनी दावा केला होता.
मुख्यमंत्र्यांवर कारवाईची टांगती तलवार- आपचे नेते सत्येंद्र जैन, मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांनी मनी लाँड्रिग प्रकरणात तुरुंगात जावं लागलं आहे. ईडीकडून सतत समन्स येत असल्यानं अरविंद केजरीवाल यांच्यावरदेखील कारवाईची टागंती तलवार आहे. ईडीनं बीआरएस आमदार कविता यांच्या घरावर शुक्रवारी छापा टाकला. त्यानंतर कथित मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी बीआरएस आमदार कविता यांना अटक केली. प्राप्तिकर विभागासह ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी छापे टाकल्यानंतर बीआरएसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली होती.
हेही वाचा-