गुवाहाटी Crime News : महाराष्ट्राचे रहिवासी संदीप कांबळे यांचा सोमवारी (5 फेब्रुवारी) गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये गूढ परिस्थितीत मृत्यू झाला होता. पोलिसांनी या घटनेमागे लव्ह ट्रॅन्गलची शक्यता व्यक्त केली होती, त्यामुळे आणखी खळबळ उडाली. आता पोलीस या प्रकरणाच्या तळाशी गेले असून, एका बंगाली जोडप्याला अटक करण्यात आली आहे. या जोडप्यानं संदीप कांबळे यांचा खून केल्याचं कबूल केलंय.
डायमंड मर्चंटची हत्या : मंगळवारी दुपारी शहराचे पोलीस आयुक्त दिगंत बोरा यांनी पत्रकार परिषदेत या खुनाची तपशीलवार माहिती दिली. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलकाता येथील गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड विकास कुमार शॉ (23) आणि अंजली शॉ (25) यांना हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. दिगंत बोरा यांनी सांगितलं की, पंचतारांकित हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये सापडलेला मृतदेह हा डायमंड मर्चंट संदीप कांबळे (44, रा. पुणे) यांचा आहे. संदीप कांबळे व्यावसायिक कामानिमित्त विविध ठिकाणी फिरत असतात.
गुवाहाटीत भेट झाली : पोलीस आयुक्तांनी, संदीप कांबळे यांच्या मारेकारी जोडप्याच्या संपर्कात कसे आले याबद्दल माहिती दिली. "संदीप कांबळे मागील वर्षी सप्टेंबरमध्ये गुवाहाटी येथील कामाख्या मंदिरात गेले होते. गुवाहाटीहून परतताना कोलकाता विमानतळावर त्यांची भेट अंजली शॉ बरोबर झाली. दोघांमध्ये फोन नंबरची देवाणघेवाण झाली. त्यानंतर अंजली आणि संदीप यांची जवळीक वाढली. दोघांनी कोलकाता आणि पुण्यातील हॉटेलमध्ये रात्र काढली. संदीप विवाहित असून 13 वर्षांच्या मुलाचा बाप आहेत. मात्र तरीही त्यांनी अंजलीला लग्नाचा प्रस्ताव मांडला. तिनं हा प्रस्ताव धुडकावून लावत संदीपला टाळण्यास सुरुवात केली आणि फोनही ब्लॉक केला."
बदनामी करण्याचा प्रयत्न : यानंतर संतापलेल्या संदीप यांनी बदला घेण्यासाठी अंजलीच्या कुटुंबीयांना आणि अंजलीचा प्रियकर विकास कुमार शॉ यांना फोन करून अंजलीची बदनामी केली. त्यांनी त्यांच्या आणि अंजलीच्या जवळच्या क्षणांचे फोटो अंजलीचा प्रियकर विकास कुमारला दाखवले. यानंतर विकास आणि अंजली यांच्या नात्यात तडा गेला, मात्र नंतर दोघांमध्ये समेट झाला. त्यानंतर या दोघांनी संदीपचा मोबाईल हिसकावून घेऊन अनैतिक संबंधाचे सर्व पुरावे मिटवण्याची योजना आखली.
जोडप्यानं योजना आखली : ठरल्याप्रमाणे अंजलीनं संदीप यांना कोलकात्याला भेटायला बोलावलं. मात्र अंजलीच्या अचानक कॉलनंतर त्यांना शंका आली, म्हणून त्यांनी तिला गुवाहाटीला भेटायला बोलावलं. दोघांनी सोमवारी गुवाहाटीला एकत्र उड्डाण केलं. प्लॅननुसार विकासही त्यांचा पाठलाग करून गुवाहाटीला गेला. संदीप आणि अंजली यांनी रॅडिसन ब्लू हॉटेलच्या नवव्या मजल्यावर रुम बूक केली. त्यानंतर काही वेळातच विकासनंही त्याच हॉटेलच्या 10व्या मजल्यावर रुम बुक केली.
हाणामारीत मृत्यू झाला : अंजलीनं त्यानंतर विकासला आपल्या रुममध्ये प्रवेश दिला आणि विकासनं रुममध्ये घुसून संदीप यांचा मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली. याचं रुपांतर हाणामारीत झालं आणि मारहाणीमुळे रक्तस्त्राव होऊन संदीपचा मृत्यू झाला. त्यानंतर अंजली आणि विकास हॉटेलमधून फरार झाले. सुरुवातीला ते ट्रेनने कोलकाता येथे जाण्यासाठी स्टेशनवर गेले. मात्र दोघांनी आपला विचार बदलला आणि आधी बुक केलेल्या फ्लाइटनं रात्री 9.15 वाजता कोलकाताला जाण्याची योजना आखली. मात्र या दोघांना विमानतळाकडे जाताना पकडण्यात पोलिसांना यश आलं.
सीसीटीव्हीच्या आधारे अटक : खून केल्यानंतर अंजली आणि विकास हॉटेलमधून निघून गेले आणि हॉटेलच्या अधिकाऱ्यांना फोनवर सांगितलं की, रुम नंबर 922 मधील व्यक्तीची तब्येत खराब आहे. त्यानंतर हॉटेलचे अधिकारी रुममध्ये गेले असता त्यांना संदीप रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अंजली आणि विकासला अटक केली. दोघांनीही पोलिसांसमोर संपूर्ण घटनेची कबुली दिली.
हत्येची योजना नव्हती : पोलीस आयुक्त दिगंत बोरा यांनी सांगितलं की, "दोन्ही आरोपींकडून संदीपचा मोबाईल तसेच त्याला बांधण्यासाठी आणलेली कापडाची दोरी जप्त करण्यात आली आहे. संदीप यांना बेशुद्ध करण्यासाठी अंजलीनं लाडू देखील बनवून आणले होते. दोन आरोपींनी पोलीस चौकशीत कबुली दिली की, मोबाईल हिसकावण्यासाठी त्यांनी ही योजना रचली होती. मात्र हत्येची योजना आखली नव्हती."
हे वाचलंत का :