नवी दिल्ली : झारखंडमधील काँग्रेसच्या आठ आमदारांचं नाराजीनाट्य कायम आहे. सर्व आमदार सध्या दिल्लीत आहेत. काँग्रेसचे सर्व आमदार सकाळपासून काँग्रेस हायकमांडला भेटण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, आणखी भेट झालेली नाही. सध्या काँग्रेसचे आमदार दिल्लीत कुठं आहेत याचा शोध घेतला असता ते येथील महिपालपूर येथील सेलिब्रेशन रिसॉर्टमध्ये थांबले आहेत. काँग्रेस हायकमांडला भेटण्याच्या प्रतिक्षेत हे आमदार आहेत.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार गैरहजर राहू शकतात : झारखंड काँग्रेसचे प्रभारी गुलाम अहमद मीर नाराज आमदारांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, जोपर्यंत हायकमांडची भेट होत नाही आणि आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत माघारी फिरणार नसल्याचं आमदारांच मत आहे. तसंच, मागण्या मान्य न झाल्यास सर्व नाराज आमदार अर्थसंकल्पीय अधिवेशनात गैरहजर राहू शकतात असही बोललं जातय.
काय आहे प्रकरण ? : झारखंडमधील चंपाई सोरेन सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर काँग्रेस आमदारांनी काँग्रेस कोट्यातून मंत्री बदलण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. बन्ना गुप्ता, बादल पत्रलेख, रामेश्वर ओराव आणि आलमगीर आलम यांना काँग्रेसच्या कोट्यातून बदलून नव्या आणि तरुण चेहऱ्याला संधी द्यावी, अशी काँग्रेस आमदारांची मागणी होती.
मतभेद नाहीत : मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. बैठकीनंतर मुख्यमंत्री चंपाई सोरेन म्हणाले, 'सरकार स्थापन झाल्यानंतर मी पहिल्यांदाच दिल्लीत आलो आणि ती एक शिष्टाचार बैठक होती. 'काँग्रेस आमदारांच्या नाराजीवर ते म्हणाले की, झारखंडमध्ये जेएमएमच्या नेतृत्वाखालील आघाडी 'मजबूत' आहे आणि राज्यातील आघाडी सरकारला कोणताही धोका नाही. पोर्टफोलिओ वाटपावरून जेएमएम आणि काँग्रेसमध्ये मतभेद असल्याच्या बातम्यांबद्दल मीडियाने विचारले असता, चंपाई सोरेन म्हणाले, 'हा मुद्दा नाही, आमची युती मजबूत आहे, असंही ते म्हणाले'
हेही वाचा :
1 भाजप सरकार जातीयवादी आणि भ्रष्टाचारी, उदयनिधी स्टॅलिन यांचा भाजपावर हल्ला
2 इंदिरा गांधींचा तिसरा मुलगा कमल घेणार हातात 'कमळ'; नाथ सोडणार काँग्रेसचा 'हाथ'
3 भाजपच्या दिल्लीतील राष्ट्रीय महाधिवेशानत मोदींची विरोधकांवर टीका, युपीएविरोधात श्वेतपत्रिका प्रसिद्ध