नवी दिल्ली Pro-Tem Speaker Of Lok Sabha : भाजपा खासदार भर्त्रीहरी महताब हे 18व्या लोकसभेचे प्रोटेम स्पीकर असतील. नवनिर्वाचित खासदारांना भर्त्रीहरी महताबच शपथ देतील. महताब यांनी ओडिशातील कटक लोकसभा मतदारसंघातून 57077 मतांनी निवडणूक जिंकली होती. त्यांनी बीजेडीच्या संतरुप मिश्रा यांचा पराभव केला होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कटक येथील भाजपा खासदार भर्त्रीहरी महताब यांची घटनेच्या कलम 95(1) नुसार हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. लोकसभेच्या अध्यक्षांच्या निवडीपर्यंत ते लोकसभेच्या पीठासीन अधिकाऱ्याची कर्तव्यं पार पाडतील. लोकसभा निवडणुकीपूर्वी भर्तृहरी महताब यांनी बीजेडी सोडून भाजपामध्ये प्रवेश केला होता.
24 जूनपासून होणार अधिवेशन : संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं की, 7 वेळा खासदार राहिलेले भर्त्रीहरी महताब यांची लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. 18व्या लोकसभेचे नवनिर्वाचित सदस्य हंगामी अध्यक्षांसमोर शपथ घेतील. त्यांना अध्यक्षांचे एक पॅनल मदत करेल. या पॅनेलमध्ये काँग्रेस नेते के सुरेश, डीएमके नेते टीआर बालू, भाजपा खासदार राधा मोहन सिंग आणि फग्गन सिंग कुलस्ते तसंच टीएमसी नेते सुदीप बंदोपाध्याय यांचा समावेश असेल. 18 व्या लोकसभेचं पहिले अधिवेशन 24 जूनपासून सुरु होणार आहे. तर नवनिर्वाचित सदस्य 24-25 जून रोजी शपथ घेतील. यानंतर लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक 26 जून रोजी होणार आहे.
काँग्रेसचा निर्णयाला विरोध : काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी भाजपाचे खासदार भर्त्रीहरी महताब यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्याचा निषेध व्यक्त करताना म्हटलं की, परंपरेनुसार सर्व नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी झाल्यानंतर पहिल्या 2 दिवसांसाठी प्रदीर्घ कार्यकाळ असलेल्या खासदाराची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली जाते. 18 व्या लोकसभेतील सर्वात ज्येष्ठ खासदार कोडीकुन्नील सुरेश (काँग्रेस) आणि वीरेंद्र कुमार (भाजपा) आहेत, जे आता आपला 8वा कार्यकाळ पूर्ण करत आहेत. नंतरचे आता केंद्रीय मंत्री आहेत त्यामुळं कोडीकुन्नील सुरेश हंगामी अध्यक्ष होतील अशी अपेक्षा होती. त्याऐवजी 7 वेळा खासदार राहिलेले भर्त्रीहरी महताब यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. ते 6 वेळा बीजेडीचे खासदार होते आणि आता भाजपाचे खासदार आहेत."
हंगामी अध्यक्ष म्हणजे काय : हंगामी अध्यक्षाला लोकसभेचे पीठासीन अधिकारी देखील म्हटलं जाऊ शकते. हंगामी अध्यक्षांना दैनंदिन कामकाज चालवावं लागतं. नूतन अध्यक्ष निवडीपर्यंत सर्व जबाबदाऱ्या भर्त्रीहरी महताब पार पाडतील. नवीन सदस्यांना शपथही देणार. तथापि हंगामी ही तात्पुरती स्थिती आहे. सभागृहाचे नवे अध्यक्ष निवडून येईपर्यंत ते काम करतील. अध्यक्ष हा बहुमतानं निवडला जातो.
कोण आहेत सात वेळा खासदार भर्त्रीहरी महताब : भर्त्रीहरी महताब यांचा जन्म 8 सप्टेंबर 1957 रोजी झाला. डॉ. हरेकृष्ण महताब यांचे ते पुत्र आहेत. त्यांनी बीजेडीचा राजीनामा दिला आणि 28 मार्च 2024 रोजी भाजपामध्ये प्रवेश केला. महताब यांनी 1998 मध्ये ओडिशाच्या कटक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकली. यानंतर त्यांनी 1999, 2004, 2009, 2014 आणि 2019 आणि 2024 मध्ये कटक मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली. 2017 मध्ये त्यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाला. यासोबतच 'डिबेट'मधील उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना संसदरत्न पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलंय.
हेही वाचा :