नवी दिल्ली BJP Announces First Candidates List : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं आपली पहिली यादी जाहीर केलीय. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत भाजपाची पहिली यादी जाहीर केलीय.
पहिल्या यादीत 28 महिला उमेदवारांचा समावेश : लोकसभा निवडणूक 2024 साठी भाजपाच्या 195 उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर झालीय. वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी उमेदवार असतील. पहिल्या यादीत ३४ केंद्रीय मंत्री, दोन माजी मंत्री आणि लोकसभा अध्यक्षांच्या नावांचा समावेश आहे. या यादीत दोन माजी मुख्यमंत्र्यांचीही नावं आहेत. भाजपच्या सोळा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी लोकसभा उमेदवारांच्या पहिल्या यादीत २८ महिला, ४७ युवा नेत्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्राला स्थान नाही : उमेदवारांच्या पहिल्या यादीत भाजपनं उत्तर प्रदेशातील 51, पश्चिम बंगालमधील 20, दिल्लीतील पाच आणि गोवा आणि त्रिपुरामधील प्रत्येकी एका लोकसभा जागांसाठी उमेदवार जाहीर केलेत. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान विदिशामधून निवडणूक लढवणार आहेत. पहिल्या यादीत महाराष्ट्राला स्थान देण्यात आलं नसल्याचं दिसून येतंय.
भाजपाच्या बैठकीत चर्चा : भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची गुरुवारी नवी दिल्लीत बैठक पार पडली होती. ही बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या बैठकीत भाजपाच्या लोकसभा उमेदवारीबाबत सविस्तर चर्चा झाली होती. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. त्यानंतर आज अखेर भाजपाकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
कोणत्या नेत्यांना उमेदवारी मिळाली? : वाराणसी - नरेंद्र मोदी, अंदमान निकोबार - विष्णू पडा रे, अरुणाचल पश्चिम - किरण रिजिजू, अरुणाचल पूर्व - तपिर गावो, सिलचर(आसाम) - परिमल शुक्ल वैद्य, गुवाहाटी - बिजुली कलिता, तेजपुर - रणजित दत्ता, नौगाव - सुरेश बोरा, दिबृगड - सर्वानंद सोनोवाल, विलापसुर (छत्तीसगड) - तोखन साहू, राजनंदगाव - संतोष पांडे, रायपूर - ब्रिजमोहन अग्रवाल, बस्तर - महेश कश्यप, दादरा नगर हवेली- लालुभाई पटेल, चांदनी चौक(दिल्ली) - प्रवीण खंडेलवाल, उत्तर पूर्वी दिल्ली - मनोज तिवारी, दक्षिण दिल्ली - रामविर सिंग बिधुडी, उत्तर गोवा - श्रीपाद नाईक, गांधीनगर - अमित शाह, राजकोट - पुरुषोत्तम रुपाला, पोरबंदर - मनसुख मांडवीय, नौसारी - सी. आर पाटील, गुना - ज्योतिरादित्य सिंधिया, भोपाल - देवल शर्मा, कोटा- ओम बिर्ला, करीमनगर- बंडी संजयकुमार, मथुरा - हेमा मालिनी, उनाव - साक्षी महाराज, लखनऊ - राजनाथ सिंह, अमेठी - स्मृती इराणी, जौनपुर - कृपा शंकर सिंह.
भाजपाची राज्यनिहाय यादी : उत्तर प्रदेश- 51, पश्चिम बंगाल - 20, मध्य प्रदेश - 24, गुजरात - 15, राजस्थान - 15, केरळ - 12, तेलंगाणा - 9, आसाम - 11, झारखंड - 11, छत्तीसगड - 11, दिल्ली - 11, जम्मू-काश्मीर - 5, उत्तराखंड - 3, अरुणाचल - 2, गोवा - 1, त्रिपुरा - 1, अंदमान - 1, दिव-दमण - 1.
हेही वाचा - "आपके साथ रहेंगे अब इधर-उधर नहीं जाएंगे"; नितीश कुमारांच्या विधानावर पंतप्रधानांना हसू आवरेना