पाटणा- कोणत्याही रस्त्यांना न जोडणार आणि शेताच्या मध्यभागी पूल तयार झाल्यानं संपूर्ण बिहारमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. हा पूल बांधूनही ग्रामस्थांच्या अडचणी दूर झाल्या नाहीत. कारण, फक्त पूल आहे. मात्र, रस्ताच नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल बांधकाम विभागाकडून मागवला आहे.
बिहारच्या सरकारी विभागाने असा पूल तयार केला आहे की, नासाचे लोकदेखील उपग्रहाच्या मदतीनं या पुलाचा शोध घेतील. कारण, या पुलाच्या समोर-मागे, उजवीकडे किंवा डावीकडे रस्ताच नाही. एवढेच नव्हे तर तुम्हाला पुलाखालून एकही नदी किंवा नाला वाहताना दिसणार नाही. मग, हा पूल का बांधला? याचा ग्रामस्थांनादेखील प्रश्न पडला आहे हा विभाग एवढ्या वेगानं काम करत आहे की काही वर्षात राज्यातील संपूर्ण शेतजमिनीमध्ये पूल दिसतील, अशी गंमतीनं ग्रामस्थ चर्चा करत आहेत.
काँक्रीटचा पूल कोणासाठी बांधला- शेतामधील पुलामुळे परमानपूर गावातील ग्रामस्थही हैराण झाले आहेत. या अजब पुलाची माहिती मिळताच अररियाच्या जिल्हाधिकारी इनायत खान यांनी घटनास्थळी अधिकाऱ्यांची फौज पाठविली. लाखो खर्चून शेतात काँक्रीटचा पूल कोणासाठी बांधला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हा पूल बांधला जात असताना जबाबदार व्यक्ती कुठे होते? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
पूलही वाकडा- जिल्ह्यातील राणीगंज ब्लॉकच्या परमानपूर पंचायतीच्या वॉर्ड क्रमांक 6 मधील बहियारच्या मध्यभागी हा पूल बांधण्यात आला आहे. हा पूलदेखील खासगी जमिनीवर बांधण्यात आल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. पुलाच्या दोन्ही टोकाला रस्ता नसल्यानं त्याचा कुणालाही काहीही उपयोग होत नाही. ग्रामस्थ जोगेंद्र मंडल यांनी सांगितले, " या पुलापासून काही अंतरावर नदी आहे. या पुलाला रस्त्याची जोडणीही करण्यात आलेली नाही. पूल बांधण्यात आल्याचा आनंद झाला. पण त्याचा काही उपयोग नाही. पूलही वाकडा आहे."
चौकशी अहवाल आल्यानंतरच कळू शकणार - अररियाच्या जिल्हाधिकारी इनायत खान यांनी संपूर्ण प्रकरण गांभीर्यानं घेतलं आहे. ग्रामीण बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे त्यांनी आदेश दिले आहे. जिल्हाधिकारी खान म्हणाल्या, " पूल बांधलेल्या ठिकाणी सुमारे 3 किलोमीटर लांबीचा रस्ता तयार करण्यात येणार आहे. तर पूल बांधण्यासाठी सुमारे तीन कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्याठिकाणी कोणत्या परिस्थितीत पूल बांधण्यात आला, हे चौकशी अहवाल आल्यानंतरच कळू शकणार आहे."
- एकीकडे बिहारमध्ये पावसामुळे पूल कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. तर अनेक ठिकाणी पूल नसल्यामुळे लोकांना जीव मुठीत ठेवून नदी ओलांडावी लागते. अशा परिस्थितीत शेतात पूल बांधण्याचा अट्टाहास का, असा ग्रामस्थांना प्रश्न पडला आहे.
हेही वाचा-