अयोध्या Ram Mandir Pran Pratishtha Schedule : अयोध्येतील बहुप्रतिक्षित राम मंदिरात सोमवारी प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व विधींना उपस्थित राहतील. याच्या एका दिवसानंतर मंदिर जनतेसाठी खुलं केलं जाईल.
प्राणप्रतिष्ठा सोहळा केव्हा सुरू होईल : हा प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवारी दुपारी 12.15 वाजता सुरू होईल आणि 1 वाजता संपेल. त्यानंतर पंतप्रधान मोदी 7,000 हून अधिक लोकांच्या मेळाव्याला संबोधित करतील. हा कार्यक्रम घरबसल्या टीव्हीवर आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर थेट पाहण्याची सोय आहे. यासाठी अनेक राज्यांनी पूर्ण दिवसाची, तर केंद्र सरकारनं अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.
'प्राणप्रतिष्ठा' म्हणजे काय : 'प्राणप्रतिष्ठा' सोहळा म्हणजे, वेद आणि पुराणांमध्ये स्थापित केलेल्या विधींद्वारे मूर्तीचं देवतेत रूपांतर करणं होय. अयोध्येतील राम मंदिरातं 16 जानेवारीपासून संस्कार सुरू झाले. ते सोमवारी, 22 जानेवारीला संपतील. या दिवशी सकाळी रामजन्मभूमी संकुलात सुरू असलेल्या विधींचा भाग म्हणून हवनकुंडात नैवेद्य दाखवला जाईल. सकाळी 9 वाजल्यापासून प्राणप्रतिष्ठेसाठी निमंत्रितांचं आगमन सुरू होईल. सुरक्षेचं कारण लक्षात घेऊन पाहुण्यांसाठी वेगवेगळ्या रांगेत बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
नरेंद्र मोदींचा कार्यक्रम : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी सकाळी 10.25 वाजता अयोध्या विमानतळावर पोहोचतील. ते सकाळी 10.55 वाजता राम मंदिरात पोहोचतील. दुपारी 12:15 ते 12:45 दरम्यान प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. दुपारी 12:20 वाजता मोदी प्रभू रामाच्या डोळ्यावरची पट्टी काढतील. त्यानंतर आरती केली जाईल. पंतप्रधानांनी रामाचं पहिलं दर्शन घेतल्यानंतर, दुपारी एक वाजल्यापासून इतर भक्तांना एक एक करून दर्शन घेण्याची परवानगी दिली जाईल. मोदी दुपारी 1 वाजता अयोध्येतील सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. दुपारी 2:15 वाजता ते कुबेर तीलावरील शिवमंदिरात दर्शन आणि पूजा करतील. पंतप्रधान सुमारे 4 तास अयोध्येत राहणार आहेत.
दर्शन आणि आरतीच्या वेळा : राम मंदिरात दर्शनाच्या वेळा दोन स्लॉटमध्ये विभागल्या आहेत.
सकाळी: 7:00 AM ते 11:30 AM
दुपारी: 02:00 PM ते 07:00 PM
दररोज तीन वेळ आरती होईल.
- शृंगार आरती : सकाळी 06:30
- भोग आरती : दुपारी 12.00
- संध्या आरती : संध्याकाळी 07:30
आरतीचं पास कसं बुक करायचं : स्लॉट उपलब्धतेनुसार भक्त ऑनलाइन किंवा मंदिरात आरती पास बुक करू शकतात. याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.
- श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- OTP प्राप्त करण्यासाठी तुमच्या मोबाईल नंबरनं लॉग इन करा.
- आरती किंवा दर्शनासाठी स्लॉट बुक करण्यासाठी 'माय प्रोफाइल' वर नेव्हिगेट करा.
- इच्छित तारीख आणि आरतीची वेळ निवडा.
- आवश्यक ओळखपत्रं द्या.
- आरती समारंभाच्या आधी मंदिराच्या आवारातील काउंटरवरून तुमचा पास कलेक्ट करा.
हे वाचलंत का :