नवी दिल्ली Arunachal Pradesh Results 2024 : अरुणाचल प्रदेशात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं घवघवीत यश मिळवलंय. राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्राबाहेर राष्ट्रवादीचे आमदार विजयी झाले आहेत. अरुणाचल प्रदेश तसंच सिक्कीममधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी पार पडली. सिक्कीममध्ये, सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चानं (SKM) 32 पैकी 31 जागांवर विजय मिळवला आहे. तसंच विरोधी सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटला केवळ (SDF) एका जागेवर समाधान मानावं लागलंय. या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग यांचाही पराभव झालाय.
अरुणाचलमध्ये भाजपाची सत्ता : दुसरीकडं, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपा पुन्हा सरकार स्थापन करणार आहे. हाती आलेल्या निकालानुसार, अरुणाचलमध्ये भाजपानं 46 जागा जिंकल्या आहेत. भाजपानं येथे 10 जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. अरुणाचल तसंच सिक्कीम विधानसभा निवडणुका 19 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात पार पडल्या होत्या. अरुणाचलमध्ये एक तर सिक्कीममध्ये काँग्रेसला खातंही उघडता आलं नाहीय. तसंच नॅशनल पीपल्स पार्टीनं 5 जागा, पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलनं 2 जागा, राष्ट्रवादी काँग्रेसनं 3 जागा जिंकल्या आहेत. तर, अपक्षांनी 3 जागांवर विजय मिळवलाय. अरुणाचलमध्ये 60 तर सिक्कीममध्ये 32 जागा आहेत. 2019 मध्ये अरुणाचलमध्ये भाजपानं 42 जागा जिंकून सरकार स्थापन केलं होतं. त्याचवेळी, सिक्कीममध्ये SKM पक्षानं 32 पैकी 17 जागा जिंकल्या होत्या.
राष्ट्रवादीनं अरुणाचल प्रदेशात फडकावला झेंडा : अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं एकूण 15 जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यापैकी तीन जणांनी विजय मिळवलाय. त्यामुळं अजित पवारांना लोकसभा निवडणुकीपूर्वीचं तोंड गोड करण्याची संधी मिळाली आहे. अरुणाचल प्रदेश विधानसभेत भाजपा सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपानं 46 जागा जिंकून विधानसभेत आपली सत्ता कायम ठेवलीय.
विधानसभेच्या एकूण जागांची संख्या : 60
- भाजपा - 46
- नॅशनल पीपल्स पार्टी - 5
- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - 3
- पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल - 2
- काँग्रेस - 1
- अपक्ष - 3
हे वाचलंत का :