नवी दिल्ली - अमेरिकेतील तपास संस्थेनं भारतीय उद्योजक अदानी समूहावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. ते सगळे आरोप अदानी समूहानं फेटाळले आहेत. सौरऊर्जा करारासाठी अनुकूल अटींसाठी लाच दिल्याचा यामध्ये प्रामुख्यानं आरोप होता. हा आरोपही अदानी समूहानं नाकारला आहे. सगळेच आरोप निराधार आहेत आणि अदानी समूह सर्व कायद्यांचं पालन करत आहे, असं स्पष्ट करण्यात आलं. आपण सर्वच आरोपांना कायदेशीर मार्गानं उत्तर देऊ असंही अदानी समूहानं स्पष्ट केलं आहे.
"अदानी ग्रीनच्या संचालकांवर यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिस आणि यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशननं केलेले आरोप निराधार आहेत ते आपण फेटाळून लावतो" असं समूहाच्या प्रवक्त्यानं यासंदर्भात जारी केलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे.
उद्योजक अदानी यांच्यावर सौरऊर्जा करारासाठी अनुकूल अटींच्या बदल्यात भारतीय अधिकाऱ्यांना 250 दशलक्ष डॉलर (सुमारे 2,100 कोटी) लाच देण्याच्या योजनेचा भाग असल्याचा आरोप अमेरिकेत करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक स्पष्टीकरण देताना अदानी समूहाच्या प्रवक्त्यानं यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिसच्या एका विधानाकडे लक्ष वेधलं. त्यात म्हटल्यानुसार "यातील आरोप हे आरोप आहेत आणि दोषी सिद्ध होईपर्यंत आणि प्रतिवादी निर्दोष मानले जातात".
"अदानी समूहानं नेहमीच कायद्याचं समर्थन आणि पालन केलं आहे आणि सर्व कार्यक्षेत्रांमध्ये अदानी समूह प्रशासन, पारदर्शकता आणि नियामक अनुपालनाची सर्वोच्च खबरदारी घेण्यासाठी वचनबद्ध आहे. आम्ही आमच्या भागधारकांना, भागीदारांना आणि कर्मचाऱ्यांना खात्री देतो की आम्ही कायद्याचं पालन करणारी संस्था आहोत आणि सर्वच कायद्यांचं पूर्ण पालन करतो." असं स्पष्टीकरण अदानी समूहानं दिलं आहे.
हेही वाचा...