सुरत Little Powerlifter : ज्या वयात मुलं खेळण्यांबरोबर खेळताना दिसतात, त्या वयात सुरतचा एक 6 वर्षाचा मुलगा ऑलिम्पिक बारबेल आणि जड प्लेट्ससह पॉवरलिफ्टिंग करतोय! आजच्या डिजिटल युगात अनेक मुलांच्या हातात सेलफोन दिसतो. अशा परिस्थितीत या छोट्या पैलवानानं पॉवर लिफ्टिंगमध्ये नाव कमावण्यास सुरुवात केली आहे. एवढ्या लहान वयातील या मुलाचं नाव आज मोठ-मोठ्या वेट लिफ्टर्सच्या ओठांवर आहे.
आतापर्यंत 17 हून अधिक पदकं जिंकली : यती जेठवा नावाच्या या 6 वर्षाच्या निरागस मुलाला पाहून तो 80 किलो वजन उचलू शकतो यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. गुजरातच्या सुरत शहरातील या छोट्या पॉवर लिफ्टरनं लहान वयातच पॉवरलिफ्टिंग आणि वेटलिफ्टिंगमध्ये 17 हून अधिक पदकं जिंकली आहेत. यती इयत्ता पहिलीत शिकतो. त्याचे वडील रवी जेठवा जिम ट्रेनर आहेत, तर आई शिक्षिका आहे. मोठं होऊन पॉवर लिफ्टिंगमध्ये नाव कमावण्याचं यतीचं स्वप्न आहे.
80 किलो वजन सहज उचलतो : यतीनं सांगितलं की, त्याला पॉवरलिफ्टिंगची खूप आवड आहे. तो शाळेतून आल्यानंतर दररोज 2 तास पॉवरलिफ्टिंग करतो. यासाठी त्याला त्याच्या आहाराची देखील काळजी घ्यावी लागते. यतीचे वडील रवी जेठवा सांगतात की, जेव्हा यती 2 वर्षांचा होता, तेव्हा ते त्याला जिममध्ये घेऊन जायचे. तेव्हापासून यतीला जिममधील पॉवरलिफ्टिंग उपकरणांमध्ये रस निर्माण झाला. त्याची आवड पाहून ते त्याला हळूहळू पॉवरलिफ्टिंगचे प्रशिक्षण देऊ लागले. आज तो 6 वर्षांचा असून त्याचं वजन 27 किलो आहे. यती जेव्हाही कोणत्या स्पर्धेत जातो तेव्हा त्याला पाहून सर्वोत्तम पॉवरलिफ्टर्सही आश्चर्यचकित होतात. यती 80 किलो वजन सहज उचलू शकते!
दररोज 2 तास जिममध्ये सराव : यतीच्या वडिलांनी सांगितलं की, तो शुद्ध शाकाहारी आहे. असं म्हणतात की, लहान वयात पॉवर लिफ्टिंग केल्यानं उंची वाढत नाही. मात्र तसं काही नाही. योग्य प्रशिक्षण मिळालं तर काहीही शक्य आहे, असं ते म्हणाले. यती दररोज 2 तास जिममध्ये सराव आणि व्यायाम करतो. त्याच्या वयानुसार तो 9व्या श्रेणीत येतो, मात्र तो इतकं वजन उचलतो की त्याच्या वयातील एकही मूल त्याच्या स्पर्धेत तग धरु शकत नाही.
हे वाचलंत का :