Nanded Accident News: वर्ग मित्रांची भेट ठरली शेवटची, गोदावरी नदीत आयटीआयच्या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू - Godavari River Rahati Nanded

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 25, 2023, 7:49 AM IST

नांदेड : नांदेडमध्ये आयटीआयचे शिक्षण घेत असलेल्या दोन विद्यार्थ्यांचा काळाने घात केला. पोहण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा गोदावरी नदीत पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना नांदेड तालुक्यातील राहटी शिवारात सोमवारी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नांदेड शहरात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आहे. बिलोली तालुक्यातील आटकळी येथील शंकर कदम ( वय 19 ) आणि नांदेड तालुक्यातील पुयडवाडी येथील शिवराज कदम ( वय 19 ) हे दोघे देखील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात शिक्षण घेत होते. सोमवारी राहाटी येथे वर्ग मित्राच्या घरी जाण्याचा त्यांनी प्लॅन केला. सोमवारी दुपारी सात मित्र राहाटी येथे आपल्या मित्राच्या घरी गेले होते. गोदावरी नदी पात्रात मित्राची भेट झाल्यानंतर सातही जण पोहण्यासाठी गेले. सर्वजण नदीमध्ये उतरुन पोहण्याचा आनंद घेत होते. मात्र नदीमध्ये पाण्याचा अंदाज न आल्यामुळे शंकर आणि शिवराज हे बुडाले. दोघेजण पाण्यात बुडाल्याचे समजताच इतर मित्रांना धक्का बसला. त्यांनी त्या दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र त्यांचा शोध काही लागला नाही. सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार आणि इतर कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली. गोदावरी जिवरक्षक दलाच्या जवानांना पाचारण केले. तीन तासाच्या अथक परिश्रमाने गोदावरी जिवरक्षक दलाच्या जवानांनी सायंकाळ पर्यंत शोध घेऊन दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले. या घटनेने मयत शंकर कदम आणि शिवराज कदम यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. लिंबगाव पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.