श्रीकृष्ण तुळशी विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीनं थाटात साजरा - तुळशी विवाह सोहळ्याचं आयोजन
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 24, 2023, 3:07 PM IST
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीनं मंडईतील साखरे महाराज मठ येथे तुळशी विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, अमोल केदारी, राजाभाऊ घोडके, विलास रासकर, यांसह महिलावर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता. एरवी वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी उत्सुक असलेल्या वऱ्हाडी मंडळींनी आज चक्क श्रीकृष्ण तुलसी विवाह सोहळ्यानंतर परमेश्वराच्या चरणी नतमस्तक होत, उत्तम आरोग्य व सुखी समाज याकरता प्रार्थना केली. तब्बल ४० वर्षांहून अधिक काळ ही परंपरा सुरू आहे. विवाह सोहळ्यापूर्वी आयोजित मिरवणुकीचं चौका-चौकात उत्साहात स्वागत करत श्रीकृष्णाच्या मूर्तीचं पूजन करण्यात आलं. मिरवणुकीत फुगड्या घालत फेर धरुन महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. दरबार ब्रास बँडदेखील सहभागी झाले होते. रांगोळीच्या पायघड्यांनी मिरवणुकीचा संपूर्ण मार्ग सुशोभित करण्यात आला होता. दगडूशेठ गणपती मंदिरापासून निघालेल्या मिरवणुकीचा समारोप समाधान चौक-रामेश्वर चौक-टिळक पुतळा मंडईमार्गे साखरे महाराज मठात झाला. त्यानंतर आयोजित विवाहसोहळ्याला पुणेकरांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली.