Saint Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala: ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा करणार आज पंढरपूरकडे प्रस्थान; लाखो भाविक आळंदीत दाखल
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : ज्ञानोबा माऊलींचा आज प्रस्थान सोहळा आहे. त्यानिमित्ताने लाखो भाविक आळंदीत दाखल झाले आहेत. आळंदी, पिंपरी- चिंचवड, पंढरपूर आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र आळंदी येथून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज दुपारी चार वाजता पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी वारकऱ्यांची मांदियाळी बघायला मिळत आहे. अलंकापुरी वारकऱ्यांनी गजबजून गेलेली आहे. इंद्रायणीचे दोन्ही काठ भाविकांच्या मांदियाळीने फुलून गेले. राज्याच्या कानाकोपऱ्यांतून वारकरी आळंदीत दाखल होत आहेत. आषाढी वारीसाठी प्रस्थान ठेवण्याचा नयनरम्य आणि भव्य सोहळा अनुभवण्यासाठी वारकऱ्यांप्रमाणेच नागरिकांचीही गर्दी जमू लागली आहे. पहाटे पाचपासून धार्मिक विधींना प्रारंभ होत आहे. आज सात वाजल्यापासून दर्शनबारी भाविकांसाठी खुली आहे. आज दुपारी बारा वाजता काल्याचे कीर्तन होईल. त्यानंतर महाप्रसाद दिला जाईल. त्यानंतर माऊलींच्या पादुकांची प्रदक्षिणा होईल. त्यानंतर समाधी मंदिरात महापूजा होईल. सायंकाळी चारच्या सुमारास प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होणार आहे.