Independence day 2023 : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे भाषण सुरू असताना शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वेळीच रोखल्याने वाचले प्राण - लोकमंगल सहकारी बँक
🎬 Watch Now: Feature Video
सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयात 77 व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्सव सुरू असताना शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. ज्ञानेश्वर भारत पाटील (वय 38) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी येथील रहिवाशी आहेत. चाळीस लाखांचे कर्ज काढून फेडले तरीही वसुली अधिकारी त्रास देत असल्याचा आरोप या शेतकऱ्याने केला आहे. शेतीवरील बोजा अधिकारी कमी करत नसल्याची खंतही या शेतकऱ्याने व्यक्त करत निराशेमधून हे टोकाचे पाऊल उचलले आहे. शेतकऱ्यावर सोलापूर शहरातील लोकमंगल को ऑपरेटिव्ह बँकेचे कर्ज असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बाजार पोलिसांनी तत्परता दाखवत शेतकऱ्यास ताबडतोब ताब्यात घेतले आहे. या शेतकऱ्याचे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्याचे आडत दुकान आहे. कांदा व्यापारी म्हणून देखील या शेतकऱ्याची ओळख आहे. हसन मुश्रीफांचे भाषण सुरू असताना ज्ञानेश्वर पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर स्वतःवर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. प्रवेशद्वारावर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्याला रोखत ताब्यात घेतले.