Ganesh Festival 2023: सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या संत तुकाराम महाराजांच्या रूपात साकारली गणेशाची मूर्ती - सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 19, 2023, 6:05 PM IST
|Updated : Sep 19, 2023, 8:07 PM IST
पुणे (पिंपरी चिंचवड) Ganesh Festival 2023: राज्यभरात आज (मंगळवारी) गणेश उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. ढोल आणि ताशाच्या गजरामध्ये भव्य मिरवणूक काढत बाप्पाचं आगमन झालं आहे. मराठी सेलिब्रेटींनी देखील आपापल्या घरी बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Cine actress Sonali Kulkarni) देखील आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत केलं आहे. (Ganapati at Sonali Kulkarni house) तिने आपल्या हाताने बाप्पाची शाडू मातीची मूर्ती तुकाराम महाराजांच्या रूपात बनवली असून प्राणप्रतिष्ठा केली आहे.
सोनाली कुलकर्णी यांचे लहानपण पुण्यभूमी देहू येथे गेले. त्यामुळे देहूमधील संत तुकाराम महाराज यांच्या पुण्यभूमीच्या मातीतून यंदाची मूर्ती घडविण्यात आली आहे. सोनाली कुलकर्णी दरवर्षी पर्यावरणपूरक असा गणेशोत्सव साजरा करत असते. यंदाही तिने शाडू माती, कागदाचा लगदा, पाणी आणि नैसर्गिक रंग वापरून हा गणपती बाप्पा साकारला आहे. शाडूच्या मातीपासून बनवलेल्या या मूर्तीला कुंकवाने रंगविण्यात आले आहे. ही मूर्ती खूप मोहक झाली असून आज पारंपरिक पद्धतीने सोनाली आणि तिच्या परिवाराने बाप्पाचं स्वागत करत दुपारी 1 वाजेच्या सुमारास प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
यावेळी अभिनेत्री सोनालीसह तिचे आई-वडील देखील उपस्थित होते. संपूर्ण कुटुंबाने मनोभावे पूजा-अर्चा करत बाप्पांची आरती केली. सोनाली कुलकर्णीनीने मला बाप्पाने खूप काही दिलं आहे. माझी सुरुवातच कला क्षेत्रात बाप्पांच्या आशीर्वादामुळे झाली आहे. त्यामुळे मला बाप्पांच्या चरणी काही मागायचं नसून आभार मानायचे आहेत. त्याचबरोबर मनोरंजन क्षेत्रावर बाप्पांची कृपा राहो, अशी प्रार्थना केली आहे. गेल्यावर्षी वृद्धापकाळाने सोनालीच्या आजीचं दुःखद निधन झाले होते. त्यामुळे मागच्यावर्षी त्यांच्या घरी गणपतीचं आगमन होऊ शकलं नव्हतं. यंदा मात्र अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आजी-आजोबांच्या आठवणीत आपल्या हाताने बाप्पांची मूर्ती बनवली आहे. तिने यंदाची गणेश मूर्ती ही आजीला समर्पित केली आहे.