उत्तर पुणे जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह गारपीट - पुणे हवामान बदल
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - उत्तर पुणे जिल्ह्यातील बहुतांश भागात गुरुवारी (ता. २९) सायंकाळी अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. द्राक्ष, टोमॅटो, गहू, हरभरा, कांद्यासह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. गुरुवारी सायंकाळी सहापासून आदिवासी भागात जोरदार पावसाला सुरवात झाली. खेड, आंबेगाव, जुन्नर या भागास झोडपून काढत पाऊस पूर्व भागाकडे सरकला. पश्चिमेकडून मार्गक्रमण करत एका तासात पावसाने अवघा जुन्नर तालुका व्यापला. नारायणगाव, जुन्नर, शिरोली, ओझर, लेण्याद्री, पांगरी, कळंब, आळेफाटा आदी सर्वच भागात उशिरापर्यंत जोरदार पाऊस सुरू होता. पावसाने शेतात उघड्यावर पडलेला कांदा, मका आदी पिके झाकण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ झाली. तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा काढणीच्या कामांना वेग आला असताना, काढणी केलेल्या पिकांमध्ये पाणी साचून नुकसान होण्याची भीती आहे. जुन्नर, आंबेगाव तालुक्यांत तासाभराहून अधिक काळ जोरदार पाऊस पडल्याने सर्व शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. नारायणगाव, मंचर परिसरात सुरू झालेला पाऊस संपूर्ण तालुक्यात बरसत असल्याने, रब्बीच्या हंगामावर पाणी फिरल्याने पिकांच्या मोठ्या नुकसानीची शक्यता आहे. नारायणगाव परिसरात दीड तासपेक्षा जास्त वेळ पावसाच्या सरी कोसळल्या. परिसरातील द्राक्ष आणि टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.