हैदराबाद : एचआयव्ही एड्स ( Human Immunodeficiency Virus ) हे मानवी आरोग्यासाठी मोठे घातक आव्हान मानले जाते. एड्स या आजारावर कायमस्वरूपी उपचार अद्याप शक्य नाही. परंतु त्याची योग्य काळजी घेतल्यास या आजाराचे गंभीर परिणाम बऱ्याच अंशी आटोक्यात आणले जाऊ शकतात. लस ही कोणत्याही रोगाविरूद्ध संरक्षण मानली जाते. त्यामुळे एचआयव्ही एड्सपासून बचाव करण्यासाठी लसीचे संरक्षण शोधण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, आतापर्यंत एचआयव्हीवर लस शोधण्यात फारसे यश आलेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 18 मे रोजी जागतिक एड्स लस दिन साजरा करण्यात येतो.
एड्समुळे गेला लाखो नागरिकांचा बळी : एचआयव्ही एड्सने आतापर्यंत लाखो नागरिकांचा बळी गेला आहे. मात्र त्यावर औषध उपलब्ध नसल्याने एचआयव्ही एड्सबाबत काहीही उपचार करता येत नाहीत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या अहवालानुसार 2019 च्या अखेरीस तब्बल 38 दशलक्ष नागरिकांना एचआयव्ही एड्सने ग्रस्त होते. त्याचवर्षी एड्स आणि संबंधित आजारांमुळे सुमारे 6 लाख 90 हजार नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. 2020 च्या अखेरीस एचआयव्ही बाधितांची संख्या तब्बल 37.7 दशलक्ष होती. धक्कादायक बाब म्हणजे त्यापैकी 1.7 दशलक्ष 15 वर्षाखालील मुले होती. या आजारामुळे आणि त्याच्याशी संबंधित कारणांमुळे 2020 या वर्षी तब्बल 6 लाख 80 हजार नागरिकांचा बळी गेला.
जनजागृतीमुळे एड्सच्या मृत्यूत झाली घट : एचआयव्ही एड्स या आजारामुळे लाखो नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. मात्र आता सरकार आणि सामाजिक संस्थांच्या वतीने एचआयव्ही एड्सबाबत जनजागृती करण्यात येते. त्यामुळे एड्स आणि त्याच्याशी संबंधित कारणांमुळे नागरिकांचा जीव गमावण्याच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार 2004 च्या तुलनेत 2020 मध्ये बळी आणि मृत्यूच्या संख्येत सुमारे 64 टक्क्यांनी घट झाली आहे.
एचआयव्ही विषाणूचा 1983 मध्ये लागला शोध : वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार 1983 मध्ये पहिल्यांदा एचआयव्ही विषाणूचा शोध लागला. त्यानंतर तब्बल 79.3 दशलक्ष नागरिकांना या विषाणूची लागण झाल्याचे उघड झाले. एचआयव्ही एड्स या संसर्गाचे गंभीर परिणाम आणि उच्च मृत्यू दर लक्षात आल्यापासून डॉक्टर, शास्त्रज्ञांसह सामाजिक संघटनाकडून या आजाराबद्दल नागरिकांमध्ये जागरूकतेसाठी सतत प्रयत्न केले जात आहेत. एड्सपासून बचाव करण्यासाठी लस शोधण्यासाठीही सातत्याने प्रयत्न सुरू असून त्यात अद्याप पूर्णपणे यश आलेले नाही.
काय आहे जागतिक एड्स लस दिनाचा इतिहास : एड्सच्या उपचार, व्यवस्थापनासाठी सुरक्षित आणि प्रभावी लस शोधण्याचे काम शास्त्रज्ञ, डॉक्टर आणि संशोधकांकडून सुरू आहे. त्यांच्या कार्याच्या प्रयत्नांचे स्मरण करण्यासाठी जागतिक एड्स लस दिन 1998 मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे यापूर्वी 1997 मध्ये आंतरराष्ट्रीय एड्स लस चाचणी करण्यात आली होती. त्याच्या वर्धापन दिनानिमित्त एचआयव्ही लस जागरूकता दिवस 18 मे 1998 रोजी साजरा करण्यात आला. हा दिवस प्रथम राष्ट्रीय ऍलर्जी आणि संसर्गजन्य रोग संस्था युनायटेड स्टेट्स नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ आणि एचआयव्ही एड्सच्या विकासासाठी काम करणाऱ्या संस्थांनी साजरा केला.
हेही वाचा -