हैदराबाद : नारद मुनीला कळीचा नारद म्हणून पुराणात मोठे महत्वाचे स्थान आहे. मात्र नारद मुनी कळीचा नारद होते की समाजाच्या कळकळीचे नारद होते, याविषयी मोठी चर्चा करण्यात येते. त्यामुळे नारद मुनी नेमके कोण होते, काय होते त्यांचे कळ लावण्यामागील धोरण, का साजरी करण्यात येते नारद जयंती, याबाबतची सविस्तर माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
कोण होते नारद मुनी : महर्षी नारद हे ब्रम्हाच्या 7 मानस पुत्रांपैकी एक होते. भगवान विष्णूंचे ते परम भक्त होते. पुराणात नारद मुनींना कळ लाव्या म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण करण्यात आली आहे. मात्र नारद मुनींना आद्य पत्रकार म्हणून संबोधले जाते. एका हातात विणा तर दुसऱ्या हातात चिपळ्या आणि मुखात नारायण नारायण असे भगवान विष्णूंचे नाव असलेल्या नारद मुनींना पृथ्वी तलावरील सगळ्यांशी मैत्री जपली आहे. म्हणून त्यांना अजातशत्रू असे संबोधले जाते.
कधी आहे नारद जयंती : वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वितीयेला नारद जयंती साजरी करण्यात येते. त्यानुसार या वर्षी 6 मे शनिवार रोजी नारद जयंती साजरी करण्यात येणार आहे. देवर्षी नारद मुनी हे तिन्ही लोकांमध्ये भ्रमण करत असल्याने त्यांना तिन्ही लोकांबाबतचे ज्ञान प्राप्त झाल्याच्या अख्यायिका पुराणात नमूद करण्यात आल्या आहेत.
काय आहे देवर्षी नारद मुनींचा इतिहास : देवर्षी नारद हे ब्रह्मदेवाच्या सात मानसपुत्रांपैकी एक मानले जात असल्याने तिन्ही लोकांमध्ये ते महत्वपूर्ण होते. शास्त्रात नीर या शब्दाचा अर्थ पाणी असा होतो. ज्ञान देणे, पाणी दान करणे आणि सर्वांना अर्पण करणे या कौशल्यामुळे त्यांना नारद म्हटले गेले. ब्रह्मवैवर्तपुराणानुसार त्यांचा जन्म ब्रह्माजींच्या कंठातून झाल्याची अख्यायिका सांगण्यात येते. महर्षी नारद हे वेद, संगीत, श्रुति, स्मृती, व्याकरण, खगोल, भूगोल, इतिहास, पुराणे, ज्योतिष, योग आदी शास्त्रांमध्ये पारंगत मानले जातात.
हेही वाचा - Narasimha Jayanti 2023 : कधी आहे नरसिंह जयंती; काय आहे महत्व, जाणून घ्या...