हैदराबाद : महात्मा फुले यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू करुन स्त्री शिक्षणाचा भारतात पाया रचला. त्यामुळे भारतातील स्त्रीयांना शिक्षणाची संधी मिळाली. मात्र त्यासाठी महात्मा फुले यांना मोठा त्रास सहन करावा लागला. महात्मा फुलेंनी शिक्षणाचे महत्व जाणल्यामुळेच त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षित केले. त्यानंतर त्यांनी पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू करुन स्त्रीयांना शिक्षणाची गंगा खुली केली. मात्र फक्त स्त्रीयांच्या शिक्षणापुरतेच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे कार्य मर्यादित नव्हते, तर फुले दाम्पत्याने विविध क्षेत्रात सुधारणेचा पाया घातला आहे. जाणून घेऊया त्यांच्या विविध कार्याबाबतची माहिती.
कोण होते महात्मा फुले : गोविंदराव फुले आणि चिमणाबाई यांच्या पोटी ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 ला झाला. महात्मा फुले यांचे मूळचे आडनाव हे गोऱ्हे असे होते, मात्र त्यांचा फुले विकण्याचा व्यवसाय असल्यामुळे त्यांना फुले हे आडनाव पडले. देशाच्या इतिहासात फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारावर सामाजिक सुधारणा करण्यात येतात. त्यामुळे महात्मा फुले हे पहिल्या पिढीतील समाज सुधारक असल्याचे स्पष्ट होते. महात्मा फुले यांनी त्या काळात इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवून अनेक इंग्रजी ग्रंथाचे पारायण केले. त्यांच्या मनावर अमेरिकन राज्य क्रांतीसह द राईट्स ऑफ मॅन या ग्रंथाचा चांगलाच परिणाम झाला होता. थॉमस पेन या सुधारणावादी विचारवंताचा त्यांच्यावर चांगलाच प्रभाव होता. त्यामुळेच महात्मा फुलेंनी जातीभेद हा खोटा असल्याचे ठामपणे मांडले. महात्मा फुले यांनी शिक्षणासह वस्ताद लहुजी साळवे यांच्याकडे दांडपट्टा आणि मल्लविद्येचेही शिक्षण घेतले होते. त्यामुळे महात्मा फुले यांनी कोणाचीही तमा न बाळगता आपल्या सामाजिक सुधारणेचा यज्ञ धगधगता ठेवला होता.
मुलींची पहिली शाळा केली सुरू : महात्मा ज्योतिराव फुले यांचे लग्न सातारा जिल्ह्यातील नायगाव येथील खंडोजी नेवसे यांच्या सावित्री या मुलीसोबत 1840 मध्ये झाला होता. मात्र भारतीय समाजात स्त्रीयांना शिक्षणाचा हक्क नसल्याने मुलींना शिकवण्यात येत नव्हते. मात्र सावित्रीबाईला शिक्षणाची आवड होती. त्यामुळे लग्नानंतर महात्मा फुले यांनी सावित्रीबाईला शिक्षित केले. मुलींना शिक्षणाचा हक्क नसल्याने महात्मा फुले हे व्यथीत झाले. त्यांनी सावित्रीबाईलासोबत घेऊन मुलींसाठी शाळा सुरू करण्याचे ठरवले. मात्र त्यांना समाजासह त्यांच्या घरातूनही चांगलाच विरोध झाला. या विरोधाला न जुमानता महात्मा फुले यांनी पुण्यातील भिडे वाड्यात 1848 ला मुलींची पहिली शाळा सुरू केली. महात्मा फुले यांनी मुलींसाठी शाळा सुरू केल्यामुळे त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला. त्यांच्या वडिलांनीही त्यांना घराबाहेर काढले. मात्र तरीही महात्मा फुले यांनी हा विरोध झुगारुन रास्तापेठ आणि वेताळपेठेत 1851 ला पुन्हा मुलींसाठी दोन शाळा सुरू केल्या. त्यांच्या या कार्यामुळे 1852 ला ब्रिटीशांच्या शिक्षण विभागाच्या वतीने मेजर कँडी यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना : महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मूल नव्हते. मात्र या दाम्पत्याने दीन दलितांनाच आपली मुले मानून त्यांची सेवा करण्याचे व्रत हाती घेतले होते. महात्मा फुले यांनी जीव वाचवलेल्या काशीबाईच्या यशवंतला दत्तक घेऊन त्यांनी यशवंतला चांगले शिक्षण दिले. त्याच्या विधवा आईची काळजी घेतली. फुले दाम्पत्यांनी काशीबाईसारखी स्थिती इतर महिलांची होऊ नये, यासाठी बालहत्या प्रतिबंधक गृहाची 1863 ला स्थापना केली. त्या माध्यमातून महिलांसाठी कार्य केले. विधवांच्या केशवपणालाही त्यांनी विरोध करत चळवळ उभी केली. महात्मा फुलेंनी ब्राह्मणांचे कसब ( 1869 ) गुलामगिरी ( 1873 ) असे ग्रंथ लिहून समाजावर आपल्या लेखणीचे आसूड ओढले. समाज सुधारणेचा पाया घातलेल्या या थोर महापुरुषाची 11 एप्रिलला जयंती आहे. त्यानिमित्त महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना ईटीव्ही भारतकडून मानाचा मुजरा.
हेही वाचा - National Safe Motherhood Day 2023 : भारतात दरवर्षी 45 हजार मातांचा होतो मृत्यू, जाणून घ्या राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवसाचा इतिहास