आपण नेहमीच उपवासाबद्दल ऐकत असतो. अनेक जण एखाद्या सणावारी किंवा धार्मिक कार्याला उपवास करतात किंवा काही जण पोटाला आराम द्यायला उपवास करतात. उपवासाचे दोन प्रकार आहेत. एक सर्वसामान्य उपवास आणि दुसरा इंटरमिटन उपवास. आम्ही तिरुपती इथल्या टीटीडीच्या एस. व्ही. आयुर्वेदिक महाविद्यालयाचे द्रव्यगुण विभागाचे प्राध्यापक डॉ. बुलुसू सीताराम यांच्याशी बातचीत केली. आणि त्यांनी सांगितलेले खालीलप्रमाणे -
सर्वसाधारण उपवास म्हणजे जड अन्नपदार्थ अजिबात न खाणे. त्याऐवजी पाणी, ताजा फळांचा रस, ताक इत्यादी द्रव पदार्थांचे सेवन करणे. पण काही जण जड अन्नपदार्थ खाल्ल्याशिवाय जास्त काळ राहू शकत नाहीत. त्यांच्यासाठी इंटरमिटन उपवास करणे योग्य होईल.
इंटरमिटन उपवास अनेक प्रकारे करता येतो. एखाद्याच्या सोयीप्रमाणे हा उपवास केला जातो. त्याचे दोन प्रकार आहेत –
- पहिले म्हणजे उपवास करणारी व्यक्ती सकाळी हलका आहार घेते, दुपारी अतिशय हलका आहार आणि रात्री अजिबातच आहार घेत नाही.
- दुसरा प्रकार म्हणजे व्यक्ती आठवड्यातून एकदा किंवा दोनदा जड आहार अजिबातच घेत नाही.
‘ शरीराला हलके वाटण्यासाठी उपवास केला जातो. शरीराला अपायकारक असलेले पदार्थ काढून टाका आणि स्वत:ला निरोगी ठेवा, ’ डॉ. सीताराम सांगतात. अर्थात, नाण्याला दोन बाजू असतात. उपवासाचे फायदेही आहेत आणि तोटेही आहेत. आमच्या तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे हे काही खाली दिले आहेत –
फायदे
- वजन कमी होते
उपवासाने शरीरातली चयापचय क्रिया वाढून वजन कमी होते. यामुळे हृदय आणि इतर महत्त्वाच्या अवयवांवरचा ताण कमी होतो. त्यांना थोडा वेळ विश्रांती दिली तर त्यांचे कार्य चांगले चालू शकते.
- दीर्घायुष्य
उपवासाच्या वेळी हृदय, यकृत, किडनी यांना आराम मिळतो. त्यामुळे त्यांचे कार्य चांगले आणि जास्त काळ चालते. त्यामुळे दीर्घायुष्य मिळते. म्हणूनच सारखा उपवास करणारी व्यक्ती बरीच वर्ष जगते.
- डिटॉक्सिफाईज
अनेकदा शरीराला घातक असलेले पदार्थ शरीरात राहतात. म्हणजे जास्त प्रमाणातले सोडियम, जड धातू किंवा शरीराला अयोग्य असलेले पदार्थ. उपवासामुळे हे पदार्थ शरीराबाहेर फेकले जातात. अनेकदा या विषारी पदार्थांमुळे शरीरातल्या महत्त्वाच्या अवयवांच्या कार्यात अडथळा येत असतो.
- स्मरणशक्ती सुधारते
उपवासामुळे तुमची स्मरणशक्ती चांगली होण्यास मदत होते. नियमित अंतराने नियमित उपवास करणे फायदेशीर आहे. शरीरात असलेल्या अपायकार पदार्थांचा परिणाम मेंदूवरही होतो.
तोटे
- किडनीच्या कार्यावर परिणाम
अनावश्यक किंवा दीर्घकाळ उपवास केल्याने शरीरात साठलेल्या प्रथिनांचे विघटन होऊ शकते. याचा परिणाम किडनीच्या कार्यावर होतो. किडनीवर जोर येतो आणि प्रकृती बिघडते.
- पॅनक्रिअॅटिकच्या कार्यावर परिणाम
अति उपवासाने शरीरातल्या पॅनक्रिअॅटिकच्या कामावर परिणाम होतो. यामुळे साखरेची पातळी वाढते. याचा परिणाम मधुमेह होण्यावर होतो.
३. शरीरातली चरबी कमी होते
शरीरातली काही चरबी शरीराचे काम सुरू राहण्यास आवश्यक असते. अति उपवास केल्याने साठवलेली चरबी कमी व्हायला लागते. याचा परिणाम त्वचा आणि मेंदूवर होतो. त्वचा कोरडी होते. तिला सुरकुत्या पडतात. केस गळायला लागतात आणि मेंदू चालेनासा होतो. यामुळे स्मरणशक्ती जाते.
म्हणूनच, उपवास योग्य प्रकारे केला तर फायदेशीर ठरतो. डॉ. सीताराम सांगतात, २४ तासाहून जास्त काळ उपवास करू नये. ज्यांना प्रकृतीसंबंधी काही त्रास असेल त्यांनी उपवास करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.