पित्ताशय म्हणजे काय?: (What is Gallbladder) शरीरामध्ये उजव्या बाजूला यकृत असते. यकृताच्या खाली पित्ताची पिशवी असते. तिला पित्ताशय असे म्हणतात. यकृतात तयार होणारे पित्त या पिशवीतून लहान आतड्यात येते. स्निग्ध पदार्थाचे पचन होण्यासाठी पित्त आवश्यक असते.
पित्ताशय खडा काय आहे?: (What is a Gallstone) पित्ताशयाच्या थैलीच्या पोटावर डाव्या बाजूला लिव्हरच्या अगदी खालील बाजूस एक छोटासा अवयव असतो. यामध्ये पित्त नावाचे पाचक द्रव्य असते. हे छोट्या आतड्यात सोडले जाते. पित्ताशयाच्या याच पिशवीत पित्ताचा खडा बनू शकतो. सुरुवातीला याची काहीच लक्षणे दिसत नाहीत आणि वेळीच जर उपचार केले नाही तर सर्जरी अर्थात ऑपरेशन करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे या समस्येकडे गांभीर्याने पाहणे महत्त्वाचे आहे.
पित्ताशयात खडे तयार कसे होतात?: (How are gallstones formed) पित्ताशयात जंतूंमुळे दाह झाल्यावर बऱ्याचवेळा नंतर खडे तयार होतात. या खड्यांचे दोन प्रकार आहेत. कोलेस्टेरॉल ७० टक्क्यांच्या वर असलेले कोलेस्टरॉल खडे, हा पहिला आणि कोलेस्टेरॉल १० टक्क्यांहून कमी असलेले रंगद्रव्य खडे हा दुसरा प्रकार. जंतूसंसर्गामुळे पित्ताशयात प्रथिनयुक्त पदार्थ तयार होतात. या प्रथिनयुक्त पदार्थांच्या सहाय्याने मग इतर क्षार तिथे गोळा होतात आणि मग खडे तयार होतात. विषमज्वर झालेल्या रुग्णामध्येही कालांतराने पित्ताशयात खडे तयार होतात.
या लोकांमध्ये खडे होण्याचे प्रमाण जास्त: चाळीशी ओलांडलेल्या दोन-तीन मुले झालेल्या, लठ्ठ स्त्रीमध्ये पित्ताशयातील खडे होण्याचे प्रमाण जास्त असते. पित्ताशयात खडे झाले, तरी कित्येक वेळा कोणतेही लक्षण लवकर दिसत नाही. मात्र काही वेळा ताप, खूप जीवघेणी वेदना, हुडहुडी भरणे अशी लक्षणे दिसून येतात. वेदना खूपच तीव्र आणि असह्य अशी असते. त्यामुळे ताबडतोब तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. दवाखान्यात कळ थांबण्यासाठी मॉर्फीन किंवा पेंटोझोकेनचे इंजेक्शन देतात.
पित्ताशयाच्या समस्या असल्यास या आहाराचे सेवन करू नये: (gallbladder problems) मांसाहारातील प्रथिनांमुळे कॅल्शिअम स्टोन आणि युरिक अॅसिड स्टोन होण्याचा धोका असतो. मासे, मांस यामध्ये प्रथिनांबरोबरच कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे मांसाहाराचे सेवन जास्त करू नये. पित्ताशयात खडे किंवा मूतखडा असेल तर मांसाहार खाणे कमी करा अन्यथा टाळा. कॉफीचे अतिसेवन करत असाल तरीही पित्ताशयावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे ज्या लोकांना पित्ताशयाचे खडे होण्याचा किंवा पित्ताशयाच्या काही तक्रारी असतील त्यांनी कॉफीचे सेवन त्वरित बंद करावे. पित्ताशयात खडे झाल्यास सोडायुक्त पेये बिलकुल सेवन करू नयेत. त्यात फॉस्फोरिक अॅसिड असते त्यामुळे पित्ताचे खडे वाढतात. बेकरी उत्पादने जसे ब्रेड, मफिन्स, कुकीज, कप केक इत्यादींचे सातत्याने केले जाणारे सेवन हे पित्ताशयाच्या आरोग्यावर प्रभाव पाडणारे ठरते. या सर्वच पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅटचे प्रमाण खूप जास्त असते. गोड पदार्थांमध्ये रिफाईंड कार्बोहायड्रेट प्रमाण खूप जास्त असते. तसेच साखरेच्या अतिसेवनामुळे कोलेस्ट्रॉल घट्टा होते त्यामुळे हृदयरोग तसेच पित्ताशयात खडे होण्याचा धोका वाढतो.