क्लिनिकमध्ये ७ महिन्याच्या बाळाला आणले होते. त्याला उलट्या, अतिसार होत होते. बाळ अगदी लहरी, चिडचिडे झाले होते. यामागे काय कारण असावे ? चौकशी केल्यावर कळले आई बाळाला फक्त भात आणि डाळीचे पाणी देत होती. शिवाय बाटलीतून दूध पाजत होती. यामुळे हे जाणवले की बाळाला हा आहार पुरेसा नव्हता. बाळाची भूक भागत नव्हती. स्तनपानाबरोबर बाळाला अजून आहार देणे आवश्यक आहे. याबद्दल आईला फारशी माहिती नसण्याने किंवा जागरुकता नसण्याने बाळाला अपाय पोचू शकतो.
पूरक आहारासाठी जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेली मार्गदर्शक तत्त्वे –
- ६ ते ९ महिन्यापर्यंत
स्तनपानाबरोबर घरी बनवलेले ताजे थोडेसे जाड आणि पातळ आणि जाड अन्न द्यावे. बाळाला २ ते ३ वेळा जेवण आणि त्याच्या मागणीनुसार १ किंवा २ स्नॅक्स द्यावे.
- ९ ते १२ महिन्यापर्यंत
आता हळूहळू जेवण द्यायचे प्रमाण वाढवा. ३ ते ४ वेळा मुख्य जेवण द्या. त्याबरोबर १ ते २ जेवणे जोडली तरी चालतील.
- १२ ते १४ महिन्यापर्यंत
३ ते ४ वेळा मुख्य जेवण द्या. त्याला जोडून २ वेळा स्नॅक्स द्या. त्याचे प्रमाण वाढवा.
- २ वर्षापर्यंत तरी स्तनपान गरजेचे आहे. त्यानंतर स्तनपान सुरू ठेवायचे की नाही हा निर्णय आईची आहे. तिची इच्छा असेल तर ती ७ वर्षांपर्यंत स्तनपान देऊ शकते.
स्तनपानाची गरज आणि वयानुसार पूरक बदलांची आवश्यकता आहे का ?
हो, नक्कीच आहे. हे टेबल पाहा. त्यात सोप्या पद्धतीने सांगितले आहे.
वय | स्तनपानातून मिळणारे पोषण | पूरक अन्नातून मिळणारे पोषण |
6-9 महिने | 70 % | 30 % |
9-12 महिने | 50 % | 50 % |
13-24 महिने | 30 % चरबी मज्जातंतूंच्या विकासासाठी महत्त्वाची ठरते | 70 % |
६ महिन्यांपर्यंत फक्त स्तनपान का ?
जास्त पोषण स्तनपानातून मिळते. यात लोह, फाॅलिक अॅसिड याशिवाय अनेक संरक्षण करणारे घटक असतात, ज्यामुळे बाळाची वाढ चांगली आणि जलद होते.
पूरक अन्न कसे सुरू करायचे ?
महत्त्वाचे नियम खालीलप्रमाणे –
- कमी प्रमाणात अन्न द्या. तुमच्या अति उत्साहाला आवर घाला. बाळाला प्रमाणापेक्षा जास्त आहार देणे टाळा.
- एका वेळी एकच पदार्थ द्या. यामुळे त्या पदार्थाची अॅलर्जी असेल तर लगेच लक्षात येते.
- बाळाला कुठल्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये म्हणून काटेकोरपणे स्वच्छतेचे पालन करा.
पूरक अन्न देताना बाळाची स्थिती
बाळाला ४५ अंशात आरामात बसवा किंवा आईसमोर तोंड करून बसवा. टेबलावर कुटुंबातल्या इतर व्यक्तींसोबत बाळाला अन्न भरवा.
बाळाला भरवताना या गोष्टींचे पालन करायला हवेच -
टीव्ही किंवा मोबाइलसमोर बाळाला भरवू नका. बाळाच्या नजरेत नजर मिसळून आणि बाळाशी बोलत भरवा. मोठी माणसे जे पदार्थ खातात आणि जसे ताटात खातात, तशा प्रकारेच बाळाला अन्न द्या. साखर, बिस्किट्स आणि बाहेरून आणलेले तयार पदार्थ टाळा. हाताने कुस्करा, चमच्याचा वापर करू नका, तोचतोचपणा टाळण्यासाठी नवे पदार्थ बाळाला द्या. तसेच नव्या चवींचे पदार्थ बाळाला कळू द्या. कृत्रिम चवींचे पदार्थ टाळा. गुळाचा वापर करा. बाळाला इडली, लाडू, कटलेट, पोहे आणि पराठा द्या. शिजवलेल्या अन्नामध्ये वरून मीठ टाकू नका. चिप्ससारखे खारट पदार्थ, साॅस देऊ नका.
जागतिक आरोग्य संघटनेने ७ पदार्थांचे प्रकार आणि सूर्यप्रकाश बाळासाठी आवश्यक असल्याचे सांगितले आहे. या ७ पदार्थांच्या प्रकारापैकी ४ तरी बाळाला दिले पाहिजेत –
- तृणधान्ये २. डाळी ३. व्हिटॅमिन अ ४. भाज्या आणि फळे ५. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ ६. अंडी, मांस आणि कोंबडी ७. व्हिटॅमिन क, ब आणि लोह.
मुलाला हंगामी फळ खाण्यास प्रोत्साहन द्या. कुस्करलेला पपया, केळी, केसर घालून केलेला शिरा द्या. संपूर्ण गव्हाच्या पिठाचा वापर त्याच्या आहारात करा. तुटलेल्या गव्हाची खिचडी द्या.
काय टाळावे ? – तांदळाचे पाणी, फळांचा रस, बेकरीमधले पदार्थ, जंक फूड, साखर कँडीज, कृत्रिम स्वाद.
महाराष्ट्रातल्या नाशिकमधल्या जगदिशा बाल मार्गदर्शन आणि स्तनपान व्यवस्थापन क्लिनिकच्या बालरोग तज्ज्ञ डॉ. शमा जगदीश कुलकर्णी एमबीबीएस, डीसीएच, आयबीसीएलसी यांनी ही माहिती दिली आहे.
It is the food which is introduced in the diet of the baby in order to meet the nutritional requirements of the baby.