आग्रा : कोरोनाने हजारो तरुणांच्या नोकरीवर कुऱ्हाड मारल्याने त्यांच्यावर बेरोजगार होण्याची वेळ आली. त्यामुळे अनेक तरुणांनी हताश होऊन आपल्या आयुष्याची राखरांगोळी केली आहे. मात्र कोरोनात नोकरीची कुऱ्हाड कोसळूनही काही तरुणांनी धैर्याने आपला व्यवसाय सुरू करुन वेगळा आदर्श घालून दिला आहे. अशाच कोरोनात नोकरी गेलेल्या तरुणानी बाजरीची कुल्फी बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यांची ही बाजरीची कुल्फी चांगलीच प्रसिद्ध झाली. त्यामुळे या तरुणांना चांगला रोजगार मिळाला असून आता त्यांची लाखो रुपयांची कमाई होत आहे. विवेक उपाध्याय आणि गगन उपाध्याय असे त्या दोन तरुणांची नावे असून ते फतेहाबाद येथील कुंडौल गावाचे राहणारे आहेत.
अन्नश्री योजनेच्या माध्यमातून झाले प्रभावित : या दोन्ही तरुणांनी दयालबाग शैक्षणिक संस्थेतून फूड प्रोसेसिंग आणि डेअरी टेक्नॉलॉजी या विषयात पदवी मिळवली आहे. शिक्षणानंतर त्यांनी आईस्क्रीम कंपनीत नोकरी मिळवली. मात्र 2020 मध्ये कोरोना महामारीमुळे विवेक आणि गगन यांची नोकरी गेली. यानंतर दोन्ही भावांनी डिसेंबरमध्ये आईस्क्रीमचा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय सुरू केल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा दुसऱ्यांदा लॉकडाऊन झाला. असे असतानाही दोघांनी हिंमत न हारता मेहनतीच्या जोरावर व्यवसाय सुरू ठेवला. हळूहळू लोकांना त्यांच्या आईस्क्रीमची चव आवडू लागली. दोघांचे नियोजन, मार्केट रिसर्च आणि सरकारी मदत यामुळे हा व्यवसाय सुरू झाला. आता त्यांच्या आईस्क्रीम कंपनीतून ३५ तरुणांना रोजगारही मिळाला आहे.
कुल्फी सगळ्यांच्या आवडीचा प्रकार : कुल्फी लहान मुलांसह कोणीही खाऊ शकते. त्यामुळे हा व्यवसाय निवडल्याची माहिती विवेकने दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अन्नांबाबतच्या आवाहनामुळे प्रेरित होऊन आम्ही आईस्क्रीम आणि कुल्फीमध्ये बाजरी वापरल्याची माहितीही त्याने दिली. त्यांच्या व्यवसायात बाजरीची कुल्फी बनवली जात आहे. या कुल्फीमध्ये बाजरीसोबत दूध आणि मध मिसळले जाते असून ते शरीरासाठी चांगले असल्याची माहिती या भावंडांनी दिली. लोकांना बाजरीची कुल्फी खूप आवडते. बाजरीची ही कुल्फी लहान मूल किंवा वृद्ध कोणीही खाऊ शकतो, असे विवेकने सांगितले. बाजरीपासून बनवलेली ही कुल्फी चवीसोबत आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. बाजरीच्या कुल्फीच्या जाहिरातीसाठी सध्या फक्त 10 रुपये किंमत ठेवण्यात आली आहे. या उन्हाळी हंगामात कुल्फीमध्ये बाजरीच्यानंतर आता लोक नाचणी आणि बार्ली घेऊन काम करू लागले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
लाखो रुपयांवर गेली उलाढाल : या दोघांनी कोरोनात नोकरी गेल्यामुळे हा व्यवसाय सुरू केला होता. मात्र 15 लाख रुपयांपासून सुरू झालेला हा व्यवसायाची उलाढाल आता 45 लाखांवर पोहोचली आहे. बाजरीची आईस्क्रीम आणि कुल्फीच्या चवीसोबतच त्याचे फायदेही लोकांना कळावेत यासाठी आम्ही काम करत आहोत, असे ते यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रांकडून 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरीचे वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. जगातील एकूण बाजरीच्या उत्पादनात भारताचा वाटा ४१ टक्के आहे. ते उत्पादन 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे मोदी सरकारचे लक्ष्य आहे. बाजरी उत्पादनाच्या बाबतीत उत्तर प्रदेश हे भारतातील अग्रगण्य राज्यांपैकी एक असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.
हेही वाचा - Role Of Counselling In Cancer Patient : कर्करोगाच्या शेवटच्या टप्प्यातील रुग्णाला समुपदेशनासह भावनिक, मानसिक आधाराची असते गरज