हैदराबाद - भावा-बहिणींच्या सुंदर बंधाचा सण रक्षाबंधन भारतभर साजरा होतो. पण यावर्षी तो आला आहे तो भीतीच्या वातावरणात. साथीच्या रोगामुळे लोक घरातच आहेत, बाजारपेठा रिकाम्या आहेत आणि सणाचा उत्साह कुठेच दिसत नाही. तरीही हे वर्ष नेहमीपेक्षा काही तरी वेगळे, नवे घेऊन येईल. ते डिजिटल असेल आणि जास्त काळजी घेणारे असेल. आम्ही मानसशास्त्रज्ञ डॉ. वीणा कृष्णन यांच्याशी या परिस्थितीबद्दल बातचीत केली. त्या म्हणाल्या, ‘आताची परिस्थिती पाहता लोकांच्या मनात सतत एक भीती असते. सण साजरा करावा की नाही, याबद्दल त्यांच्या मनात आजही संभ्रम आहे. यामुळे ते निराश होतात. त्यामुळे लोक आशावादी असणे गरजेचे आहे. लोकांनी सण जोरदार साजरा करण्यापेक्षा घरच्या घरी कमी प्रमाणात साजरा करायला हरकत नाही. सर्व प्रकारची काळजी घेऊन सण साजरा करायला हरकत नाही.
यावेळी भावंडे एकमेकांना भेटणे कदाचित शक्य होणार नाही. पण सध्या फोन आणि इंटरनेटमुळे जग छोटे झाले आहे. एकमेकांशी संपर्क साधणे आता सहज झाले आहे. तुम्ही व्यक्तिश: एकमेकांना भेटू शकणार नाहीत. पण, लोक डिजिटल माध्यमातून एकमेकांना भेटू शकतात आणि ते सुरक्षेच्या दृष्टीने योग्य देखील आहे. यामुळे ते भावनिकदृष्ट्या भक्कम राहतील आणि एकमेकांच्या संपर्कात आपण आहोत, ही भावना त्यांच्यात निर्माण होईल, डॉ. वीणा कृष्णन म्हणाल्या.
या वर्षीचा ट्रेंड काय आहे?
सण साजरा करताना सर्व प्रकारची काळजी घ्या.
तुम्ही जवळ राहणाऱ्या कुटुंबाला भेट देणार असाल तर मास्क घाला, ग्लोव्हज आणि इतर संरक्षक गोष्टी वापरा.
बाजारातून मिठाई खरेदी करून नेण्यापेक्षा घरी तयार केलेले काही आरोग्यदायी पदार्थ घेऊन जा.
भेटवस्तू म्हणून चॉकलेट्स, महागडी गिफ्ट्स देण्यापेक्षा तुमच्या भावंडांना फळे किंवा त्यांना उपयोगी पडतील अशा वस्तू म्हणजे सॅनिटायझर, मास्क इत्यादी भेट म्हणून द्या.
सण, उत्सव तेच आहेत. पण काळाप्रमाणे त्याचे अर्थ बदलले आहेत. आज आपण समाजातली स्त्री शक्ती आणि समानता याबद्दल बोलतो. आज स्त्री ही स्वतंत्र राहू शकते. आता फक्त भाऊच बहिणीचे संरक्षण करण्याचा शब्द देत नाही तर बहिणही आपल्या भावाचे रक्षण करते.