हैदराबाद : जगभरात सुमारे 2.2 अब्ज नागरिक दृष्टीदोषाने ग्रस्त असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीने स्पष्ट होते. कमकुवत दृष्टी, आनुवंशिकता, खराब जीवनशैली, आरोग्य आणि पर्यावरणाबद्दल निष्काळजीपणा आदी अनेक कारणांमुळे दृष्टीदोष होऊ शकतो. योग्य काळजी घेऊन वेळेवर निदान आणि उपचार केल्याने दृष्टीदोष बरा होऊ शकतो, असा डॉक्टरांचा विश्वास आहे. डोळ्यांतील अॅलर्जी, पडद्याबाबतचे आजार, मोतीबिंदू आणि काचबिंदूसारख्या समस्याही बऱ्या होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 1 ते 7 एप्रिल या कालावधीत सरकारच्या वतीने अंधत्व प्रतिबंध सप्ताह साजरा करण्यात येतो.
निष्काळजीपणा सोडा : डोळे हा शरीराचा महत्वाचा घटक आहे. त्यामुळे नागरिकांना डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. नागरिकांना डोळे सुरक्षित ठेवायचे असतील तर निष्काळजीपणा टाळून नियमित तपासणी करणे गरजेचे आहे. गेल्या काही वर्षांत दृष्टीदोष होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्याचवेळी उपचारांची उपलब्धता असूनही मोतीबिंदू किंवा काचबिंदूसारख्या आजारांमुळे लोकांमध्ये अंधत्व येण्याचे प्रमाण वाढले आहे. सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे हे याचे मुख्य कारण असल्याचे तज्ज्ञ व्यक्त करतात. योग्यवेळी उपचार न करता, निष्काळजीपणा केल्यामुळे हा आजार वाढत जातो. त्यामुळे दृष्टीदोषाची कोणतीही लक्षणे आढळून आल्यास लगेच त्यावर उपचार सुरू करा.
सप्ताहात केली जाते जनजागृती : अंधत्व प्रतिबंध सप्ताहात अधिकाधिक नागरिकांना डोळ्यांच्या संबंधित लक्षणांबद्दल जागरूक करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांना नियमित नेत्रतपासणी, डोळ्यांची योग्य काळजी, कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसल्यास प्रयत्न केले जातात. उपचारात निष्काळजीपणा न ठेवण्यास आणि योग्यवेळी योग्य उपचार घेण्यास प्रोत्साहित केले जाते. त्याचबरोबर अंध व्यक्तींच्या उत्थान आणि पुनर्वसनाच्या समस्यांबाबतही या निमित्ताने प्रयत्न करण्यात येतात. या साप्ताहिक कार्यक्रमात सरकारी आणि निमसरकारी संस्थांकडून जनजागृती करण्यात येते. संपूर्ण आठवडाभर अनेक सरकारी केंद्रे आणि खासगी रुग्णालयांमध्ये डोळ्यांची काळजी आणि तपासणी संदर्भात शिबिरे आयोजित केली जातात. यानिमित्ताने नियमित नेत्रतपासणी करून घ्यावी, असे आवाहनही यावेळी करण्यात येते.
43 दशलक्ष नागरिक अंधत्वाने ग्रस्त : जगभरात सुमारे 43 दशलक्ष लोक अंधत्वाने ग्रस्त असल्याचे इंटरनॅशनल एजन्सी फॉर द प्रिव्हेंशन ऑफ ब्लाइंडनेस व्हिजन ( IAPB ) च्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे. तर 295 दशलक्ष नागरिक मध्यम किंवा गंभीर दृष्टीदोषाने ग्रस्त आहेत. जागतिक पातळीसह भारतातही दृष्टीदोषाने अनेक नागरिक ग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतात दृष्टीदोषाने 20 लाख नागरिक दरवर्षी बाधित होत असल्याचेही या आकडेवारीनुसार उघड झाले आहे. मात्र त्यापैकी सुमारे 73 टक्के नागरिक पूर्णपणे बरे होऊ शकत असल्याचा दावाही या अहवालात करण्यात आला आहे.
काय आहेत कारणे : वेळेवर उपचार न केल्यामुळे जगातील जास्तीत जास्त नागरिकांना मोतीबिंदू आणि काचबिंदूने अंधत्व आले आहे. दुसरीकडे खराब जीवनशैली, आहार, दृष्टीदोष आदी समस्यांसाठी देखील जबाबदार असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. लहान मुलांच्या आहारात जंक फूड, प्रोसेस्ड फूड, चिप्स आणि इतर अनेक प्रकारच्या अन्नाचे प्रमाण वाढले आहे. त्याचा शरीराला फायदा न होता हानी होते. याशिवाय गेल्या काही वर्षांत टीव्ही, मोबाईल, लॅपटॉपचाही लोकांच्या डोळ्यांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. आजच्या युगात, लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत, मनोरंजन, अभ्यास आणि कामासाठी स्मार्ट स्क्रीन उपकरणांसमोर जास्त वेळ घालवतात. त्यातून निघणाऱ्या अतिनील किरणांमुळे डोळ्यात कोरडेपणासह अंधुक दिसण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
अशी घ्या काळजी :
- आपले डोळे निरोगी ठेवण्यासाठी पौष्टिक आहार घेण्याबरोबरच इतरही खबरदारी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. - प्रत्येक वयात नियमित डोळ्यांची तपासणी करा. - स्मार्ट स्क्रीन वापराताना सावधगिरी बाळगा, - टीव्ही जास्तवेळ पाहणे टाळा किंवा मोबाईल आणि कॉम्प्युटरवर काम करताना ब्रेक घेत राहा. - मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असल्यास नियमित डोळ्यांची तपासणी करा. - नियमित डोळ्यांचे व्यायाम करा. - डोळ्यांना खाज सुटणे, कोरडेपणा किंवा अंधुक दिसल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा. - उन्हात आणि धुळीच्या वातावरणात काम करताना डोळ्यांवर चांगल्या दर्जाचा चष्मा लावा. - दिवसातून दोनदा डोळे स्वच्छ पाण्याने हलक्या हाताने धुवा. - पूर्ण झोप घ्या आणि कामाच्या दरम्यानही थोड्या अंतराने डोळ्यांना विश्रांती देण्याचा प्रयत्न करा.
हेही वाचा - Increase Obesity Risk In Children : गरोदर मातेला कोरोनाची लागण झाल्यास मुलांमध्ये वाढतो लठ्ठपणाचा धोका