दर वर्षी २० ऑगस्ट रोजी जागतिक मच्छर दिन साजरा होतो. सर रोनाल्ड रॉस या ब्रिटिश डॉक्टरची आठवण म्हणून हा दिवस साजरा होतो. १८९७ मध्ये मादी डास माणसांमध्ये मलेरिया संक्रमित करते असा शोध त्यांनी लावला. १९३० पासून लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रोपिकल मेडिसिन जागतिक मच्छर दिन साजरा करते. डासांपासून पसरणाऱ्या आजारांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी हा दिवस आहे. विशेष करून मलेरियाबद्दल ही जनजागृती आहे आणि त्याचा प्रतिबंध कसा होऊ शकतो, हेही लोकांपर्यंत पोचवणे हा उद्देश आहे.
डास म्हणजे इंग्लिशमध्ये ‘ मासक्युटो ’ हा शब्द स्पॅनिश ‘ मुस्केटा ’वरून आला आहे. याचा अर्थ ‘ कमी उडणारा ’. जगभरात डासांच्या ३००० प्रजाती आहेत. त्यातल्या फक्त ३ प्रजाती या आजार पसरवणाऱ्या आहेत. त्या आहेत –
१. एडिस : चिकनगुनिया, डेंग्यू ताप, लिम्फॅटिक फाइलेरियासिस, रिफ्ट व्हॅली ताप, पिवळा ताप, झिका या आजारांसाठी ही प्रजाती कारणीभूत असते.
२. अॅनोफिल्स : ही प्रजाती मलेरिया, लिम्फॅटिक फायलेरियासिस पसरवतात. ( आफ्रिका )
३. कुलेक्स : हे डास जपानी एन्सेफलायटीस, लिम्फॅटिक फाइलेरियास, वेस्ट नाईल ताप पसरवतात.
दर वर्षी, डासांमुळे होणाऱ्या आजारांमुळे जगभरातील कोट्यवधी लोक मरतात. जगातील सर्वात प्राणघातक प्राणी म्हणून डासांची ओळख का आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही. या डासांपासून कायम मुक्ती मिळावी असे आपल्याला वाटत असले तरीही आपल्याला हे विसरून चालणार नाही की जीवसृष्टीत त्यांचेही महत्त्व आहे. ते अनेक प्राणी, पक्षी आणि किडे यांचे अन्न आहेत.
डासांविषयीची मजेशीर तथ्ये –
⦁ मादी डास मानवाच्या रक्तावर पोसली जाते, तर नर डास झाडांपासून मिळणारा रस घेतो.
⦁ मादी डासाला त्यांच्या अंड्यांच्या वाढीसाठी रक्त लागते. म्हणून हे डास माणूस आणि प्राण्यांचे रक्त शोषून घेतो.
⦁ अॅनोफिल्स ही डासांच्या प्रजातीची पैदास ही पावसाचे पाणी, साचलेले पाणी, कालवे इथे होते, तर एडिस ही प्रजाती माणसाने साठवलेल्या पाण्यात तयार होते.
⦁ अॅनोफिल्स विशेष करून संध्याकाळ आणि पहाटेच्या दरम्यान चावतात, तर एडिस चावण्याचा कालावधी पहाटे आणि संध्याकाळी चावतात.
⦁ डास जास्तीत जास्त ६ महिने जगतात.
⦁ डास त्यांची शिकार CO2 म्हणजे कार्बन डायोक्साइडवरून शोधतात. माणसे आणि प्राण्यांच्या उच्छवासावरून ते माग काढतात. ७५ फुटावरून ते आपली शिकार ओळखतात.
डासांविषयी काही मिथके आणि गैरसमजुती !
1. डास ओ + रक्तगटापासून पोषण मिळवतात.
अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थांनी (एनआयएच) केलेल्या अभ्यासानुसार असे आढळले आहे की एडिस अल्बोपिक्टस प्रजाती ही सर्व प्रकारचे रक्तगट – ए,बी,एबी आणि ओ – शोषून घेते. डास ओ आणि ए रक्तगटाच्या व्यक्तींकडे आकर्षिले जात होते. पण त्याबद्दलचे संशोधन अजून सुरू आहे.
डास भडक रंगाच्या कपड्यांकडे आणि जास्त तापमान असलेल्या व्यक्तींकडे आकर्षिले जातात.
2. डास कोविड १९ पसरवतात
कोविड १९ चे संक्रमण डासांमुळे होते, असे काही आढळून आलेले नाही. असा काही डेटा नाही. हा आजार संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या शिंकण्यातून किंवा खोकल्यातून पसरतो.
3. डास चावल्याच्या ठिकाणी खाजवले तर लवकर बरे होते
नाही. असे केल्याने तात्पुरते बरे वाटेलही. पण त्याने लवकर बरे वाटणार नाही. उलट खूप त्रास होईल आणि त्वचेला संसर्ग होऊ शकेल. तुम्ही त्यावर बर्फ, अलोविरा किंवा कॅलॅमिन लोशन लावू शकता.
4. डास चावल्यानंतर मरतात
काही मधमाश्यांप्रमाणे डास तुम्हाला चावल्यानंतर मरणार नाहीत. त्याऐवजी अंडी घालण्यासाठी आवश्यक रक्त मिळवण्यासाठी ते पुष्कळ लोकांना किंवा कदाचित पुन्हा पुन्हा तुम्हाला चावतील.म्हणून डासांना दूर ठेवण्यासाठी हलक्या रंगाचे, पूर्ण शरीर झाकणारे कपडे परिधान करा. खाजवू नका. साठलेले, अस्वच्छ पाणी काढून टाका. दिवसा झोपलात तरीही मच्छरदाणी लावा आणि तुमच्या आजूबाजूला निर्जंतुकीकरण करा.