हैदराबाद - वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील कसरतींमुळे कुणीही थकून जाते आणि याचा परिणाम म्हणून व्यक्तीला तणावाला सामोरे जावे लागते. आता तर कोविड १९मुळे या तणावात भरच पडली आहे. कामासाठी संघर्ष, नातेसंबंध टिकवून ठेवण्याचा ताण यामुळे ही आव्हाने जास्तच वाढली आहेत.
असे म्हणतात काही प्रमाणातला तणाव हा चांगला असतोही आणि प्रत्येकालाच अनेकदा आयुष्यात त्याला तोंड द्यावे लागते. पण तीव्र तणावामुळे फक्त मनावरच नाही तर शरीरावरही नकारात्मक परिणाम होत असतो. म्हणूनच त्यावर लक्ष ठेवावे लागते. हैदराबादच्या एएमडी आयुर्वेदिक मेडिकल महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. राज्यलक्ष्मी माधवम (एमडी आयुर्वेद) म्हणतात, ‘तीव्र तणावामुळे जळजळ निर्माण होते. त्याने शरीराला हानी पोचू शकते. तणाव हा सकारात्मक आणि नकारात्मक असतो. सकारात्मक तणाव तुमच्या शारीरिक आणि मानसिक क्रियांमध्ये एकाग्रता आणतो आणि तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोचायला मदत करतो. पण नकारात्मक तणाव हीच एकाग्रता कमी करतो आणि उलट काम करतो.’
तणावामुळे पुढील गोष्टी होतात –
- डोकेदुखी
- अस्वस्थता
- मूड बदलणे आणि निराशा
- उच्च रक्तदाब
- निद्रानाश
- पोट बिघडणे
डॉ. राज्यलक्ष्मी यांनी तणाव कमी करण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या काही आयुर्वेदिक वनस्पती सांगितल्या आहेत –
- अश्वगंधा – अश्वगंधा तणावाच्या हार्मोन्सचे प्रमाण कमी करते.
- ब्राह्मी – यामुळे तणावरहित हार्मोन्स चांगले कार्यरत होतात. मनाला शांत वाटते. तुमचा तणाव खूप कमी होतो.
- तुळस – ही पवित्र वनस्पती अँटिऑक्सिडेंट्सचा उत्कृष्ट स्रोत आहे. जेव्हा शरीरात खूप तणाव असतो, तेव्हा तो कमी करायला तुळशीचा उपयोग होतो.
- वाचा – यामुळे शरीरातली कोर्टिसोलची पातळी कमी होते. मेंदूत संतुलन राहते.
- जटामानसी – यामुळे झोप चांगली लागते आणि यामुळे तुमचा तणाव कमी होतो.
- इतर वनस्पती
- अर्जुन
- भृंगराज
- शंखपुष्पी
- यष्टीमध
- गुडुची
याशिवाय तज्ज्ञ सांगतात –
व्यक्तीने आरोग्यदायी आहार घ्यावा. बदाम आणि इतर ड्राय फ्रुट्स खावेत, अँटिऑक्सिडेंट्स असलेला ग्रीन टी घ्यावा. शिवाय ब्राऊन राईसही तणाव कमी करण्यासाठी उपयोगी आहे.
रोज योग, मेडिटेशन आणि प्राणायाम करा.
स्वच्छ ठिकाणी झोप घ्या.
दारू, सिगरेट, कॅफिन आणि शरीराला उत्तेजना देणारी पेय टाळा.
संगीत थेरपीही तणाव कमी करण्यासाठी उत्तम असते.
‘आयुर्वेदात तणाव कमी करण्याच्या दोन पद्धती आहेत. शिरोधारा (औषधी तेलाची धार कपाळावर सोडणे) आणि शिरोबस्ती (डोक्यावर तेल ओतणे आणि काही वेळ तिथे राहू देणे).
या औषधी वनस्पती आणि नंतर नमूद केलेल्या पद्धती ताणतणावाचा सामना करण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात, परंतु त्या केवळ वैद्यकीय देखरेखीखालीच घ्याव्यात. औषधे किती प्रमाणात घ्यावीत आणि कशी घ्यावीत हे डॉक्टरांनाच विचारा. याशिवाय निरोगी जीवनशैली आणि संतुलित आहार यामुळे तणाव दूर राहू शकेल.