यवतमाळ- जिल्हा परिषदेच्या चार विषय समिती सभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात शिवसेनेच्या वाट्याला दोन पदे आली आहेत. त्यासाठी ज्येष्ठ सदस्य श्रीधर मोहोड आणि पालकमंत्री संजय राठोड यांचे बंधू विजय राठोड यांनी नामांकन दाखल केले. काँग्रेसच्या वाट्याला दोन पदे आली असून त्यासाठी जयश्री पोटे आणि राम देवसरकर यांनी नामांकन दाखल केले.
हेही वाचा- यापूर्वी शिवसेना संविधानाप्रमाणे चालत नव्हती का? फडणवीसांचा चव्हाणांना टोला
जयश्री पोटे यांना महिला व बाल कल्याण, तर राम देवसरकर यांना बांधकाम समिती मिळण्याची शक्यता आहे. या समित्यांवर शिवसेनेकडून दारव्हा व केळापूर, तर काँग्रेसकडून कळंब व उमरखेड तालुक्याचे वर्चस्व राहिले आहे. सभापती पदासाठी एक-एकच नामांकन आल्याने बिनविरोध निवड झाली आहे.
जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली आहे. कालिंदा पवार यांच्या रुपाने अध्यक्षपद शिवसेनेकडे आहे. क्रांती उर्फ बाळासाहेब कामारकर या राष्ट्रवादीच्या सदस्याला उपाध्यक्षपद देण्यात आले आहे. तर सभापतिपदे शिवसेना व काँग्रेसने वाटून घेतली आहेत.