यवतमाळ - पाणी फाउंडेशन पुरस्कृत सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतीची सुरुवात ८ एप्रिलच्या रात्री १२ वाजता श्रमदानाचा बिगुल वाजवून करण्यात आली. त्यानंतर अवघ्या महाराष्ट्रात 'एकजुटीनं पेटलं रान.., तुफान आलं या..!’ अशीच स्थिती निर्माण झाली आहे. जलसंवर्धनाच्या या स्पर्धेत नववधूवरही उत्साहाने सहभागी झाल्याचे चित्र जिल्ह्यातील रातचांदण या गावात पाहायला मिळाले. या आदीवासीबहुल गावातील एका विवाह जमलेल्या जोडप्याने बोहल्यावर चढण्याआधी पाणी फाउंडेशनच्या अभियानात सहभाग घेऊन श्रमदान केले आहे.
वधू जयश्री मेंढे तिच्या एका निर्णयामुळे आज या गावात लग्न जुळले तर पहिले श्रमदान करायचे आणि नंतरच बोहल्यावर चढायचा, निर्धारच गावातील ग्रामस्थांनी केला आहे.
पाणी फाउंडेशन पुरस्कृत सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेत यवतमाळ तालुक्यातील ४६ गावे दुष्काळावर मात करण्यासाठी सहभागी झाली आहेत. गावात समतल चर (सीसीटी), अनघड दगडी बांध (एलबीएस), तर कुठे शोषखड्डे खोदून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेच्या सुरुवातीचा क्षण अन् क्षण त्यांच्यासाठी महत्वाचा असल्याचे दर्शविण्यासाठी पहिल्याच रात्री पहिल्या मिनिटाला विविध कामांची सुरुवात करण्यात आली. ४६ गावांनी स्पर्धेत सहभाग नोंदवून दुष्काळाशी दोन हात करत जलसंधारणाच्या कामांना सुरुवात केली. यामध्ये पाणी फाउंडेशनच्या चमूचे कष्टही महत्त्वाचे ठरले आहे.
गावकरी आपल्या कामातून सकाळ व सायंकाळी वेळ काढून लहान मुले, युवक, आबालवृद्ध दिवस-रात्र एक करून गाव पाणीदार करण्यासाठी धडपड करीत आहे. पाणी फाऊंडेशनच्या या कामात तालुका समन्वयक म्हणून समाधान इंगळे, अश्विनी दवारे काम पाहत आहे. तर गोपाल महल्ले, कुणाल शिवणकर यांच्यासह अनेक युवक या पाणी फाउंडेशन च्या कामात सक्रीय सहभागी झाले. यांना गावातील गावकऱ्यांचाही मोलाचा सहभाग लाभत आहे.