यवतमाळ - कोलकाता येथे डॉक्टरांना झालेल्या मारहाण प्रकरणाचा निषेध म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनने देशव्यापी संप पुकारला आहे. या संपाला पाठिंबा देत शहरातील सर्व रुग्णालये बंद ठेवण्यात आली आहेत.
शहरातील सारस्वत चौकातून मुक मोर्चा काढून या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला आहे. या मोर्चामध्ये डॉक्टरांच्या विविध संघटनांसह सामाजिक संघटना व नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. डॉक्टरांवर होणारे हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे यावर शासनाने उपाययोजना करणे गरजेचे असुन देखील याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
सारस्वत चौकातून निघालेला मोर्चा दत्तचौक, बस स्टॅण्ड चौक, नेताजी चौक, येथून मार्गक्रमण करीत पोष्टल ग्राऊंडवर संपवण्यात आला. यावेळी आयएमएचे माजी राज्य अध्यक्ष डॉ. टी. सी. राठोड यांनी आजचा बंद आणि शासन प्रणालीबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यवतमाळ शाखेचे अध्यक्ष, डॉ. अनुप कोठारी यांच्यासह इतर डॉक्टरांनी जिल्हाधिकारी यांना आपल्या मागण्याचे निवेदन दिले.
या मोर्चामध्ये इंडीयन मेडिकल असोशियेशन, निमा संघटना, औषधी विक्रेता संघटना, होमिओपॅथी संघटना, डेंटल संघटना, यासह माहेश्वरी समाज, अग्रवाल समाज, जेसीस, रोटरी क्लब, चेंबर ऑफ कॉमर्स, रेडकॉस, बंजारा संघ, मार्ड, वैदयकिय विदयार्थी, मेडीकल रिप्रेझेंटेटिव्ह, आरोग्य भारती, बार असोशियेशन तसेच इतर नागरिकांनी सहभागी होवून निषेध नोंदविला आहे.