यवतमाळ - उमरखेड तालुक्यातील बंदी भाग म्हणून परिचित असलेल्या मथुरानगर येथे एका शेतकऱ्यावर पट्टेदार वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात शेतकरी जबर जखमी झाला आहे.
सध्या जिल्ह्यात गहू, हरभरा सिंचन करण्याची कामे जोरात सुरू आहे. आठवड्यातील काही दिवस रात्री वीज येत असल्याने अनेक शेतकरी रात्री सिंचनासाठी शेतात राहतात. या भागात दिवसाही वाघाचे दर्शन अनेकांना झाल्याचे ऐकण्यात आहे. याच भीतीपोटी मोहन अमरासिंग टाकडा (रा.मथुरानगर) गुरांचे रक्षण करण्यासाठी गुराच्या बाजुला झोपले होते.
दैव बलवत्तर म्हणून...
अमरासिंग टाकडा झोपेत असताना पट्टेदार वाघाने हल्ला केला. मात्र, दैव बलबत्तर म्हणून ते थोडक्यात बचावले. वाघाने पंजा डोक्याला मारल्याने त्यांना दुखापत झाली आहे. त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे पाठवले आहे. या भागात दिवसाही वाघाचा संचार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आपल्या जनावरांच्या रक्षणासाठी आणि पिकांना जगविण्यासाठी शेतकऱ्यांना आपला जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे.
हेही वाचा - बुलडाण्यात चारचाकी-दुचाकीच्या जोरदार धडकेत पती-पत्नी ठार!