यवतमाळ - घाटंजी तालुक्यातील एका महिलेने माजीमंत्री तथा आमदार संजय राठोड यांच्यावर शरीर सुखाची मागणी केल्याची तक्रार स्पीड पोस्टने जिल्हा पोलीस अधीक्षक व घाटंजी पोलीस ठाण्यात केली होती. याप्रकरणी या महिलेचा शोध घेऊन पोलीस पथक तिच्या घरी गेले असता आज माझ्या वडिलांची प्रकृती ठीक नाही व माझी मनस्थिती आज जबाब देण्याची नसल्याचे लिहून दिले. त्यामुळे ही तक्रार कोणी पाठवली असल्याच्या अफवाला पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे ही तक्रार पीडित महिलेचीच असल्याची स्पष्टोक्ती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ दिली आहे.
चौकशीसाठी विशेष पथक
11 ऑगस्ट रोजी पीडित महिलेने स्पीड पोस्टने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय व घाटंजी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने तपास करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे यांच्या नेतृत्वात विशेष चौकशी पथकाची नेमणूक केली. यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, सायबर सेल, महिला व बाल प्रतिबंधक कक्ष, भरोसा सेल, अवधूतवाडी व घाटंजी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांचा या पथकात समावेश आहे.
हेही वाचा -संजय राठोड यांच्यावर पोलीस कारवाई कधी होणार? - चित्रा वाघ
'आज जबाब देण्याची मनस्थिती नाही'
पीडित महिलेच्या तक्रारीवरून घाटंजी तालुक्यातील सासरी व माहेर असलेल्या लाडखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरी तसेच यवतमाळ येथील नातेवाईकाच्या घरी हे पथक जाऊन आले. यावेळी घाटंजी पोलीस ठाण्याचे ठाणेदार व पथकाला ही महिला घरी आढळली. तिचे जबाब घेतले असता तिने आज माझी मनस्थिती जबाब देण्याची नसल्याचे स्पष्ट लिखित स्वरूपात लिहून दिले. त्यामुळे हे पथक आता तिची मनस्थिती होईल, त्यावेळी जाऊन जबाब घेणार आहे, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे. त्यामुळे या तक्रारीमध्ये किती तथ्य आहे, खरच माजीमंत्री तथा आमदार संजय राठोड यांनी या पीडित महिलेचे शोषण केले का? हे तपासात निष्पन्न होणार आहेत. हे प्रकरण संवेदनशील असून कायदेशीर तरतुदीप्रमाणे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्हा पोलीस दल हाताळणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी सांगितले आहे.
हेही वाचा -हा तर राजकीय आयुष्यातून उध्वस्त करण्याचा डाव; संजय राठोडांची प्रतिक्रिया