यवतमाळ - नागरिकांनी कोरोना संचारबंदीत शांतता राखावी यासाठी शहरातील विविध भागातून एसआरपीएफच्या(राज्य राखीव दल) तुकडीसह पोलीस दलाकडून पथसंचलन करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यवतमाळमध्ये संचारबंदी लागू आहे. तरीही अनेक लोक विनाकारण बाहेर फिरत असल्याचे निदर्शनास येते. अशा लोकांना आळा बसावा आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पथसंचलन करण्यात आले. अप्पर पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी या पथसंचलनाचे नेतृत्व केले.
उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर, पोलीस निरीक्षक धनंजय सायरे, आनंद वागतकर हेही या संचलनात सहभागी झाले होते. हे पथसंचलन शहरातील कळंब चौकात पोहचल्यानंतर मुस्लिम बांधवांकडून पथसंचलन करणाऱ्या पोलिसांवर पुष्पवृष्टीकरून टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले.