यवतमाळ - शेतकऱ्यांची आर्थिक लूट होऊ नये म्हणून शासनाने जिल्ह्यात तूर आणि हरभराची खरेदी नाफेडद्वारे केली. मात्र, या शेतमालाचे चुकारे अद्यापही शेतकऱ्याला मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी ऐन पेरणीच्या तोंडावर आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतकाऱयाला पैशाच्या जुळवाजुळवीसाठी दारोदार भटकावे लागत आहे.
आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ नये म्हणून शासनाने यावर्षी खरीप आणि रब्बी पिकाच्या खरेदीसाठी नाफेडची खरेदी केंद्र सुरू केले होते. त्याठिकणी तूर आणि हरभऱ्याच्या पिकाची हमी दराने खरेदी करण्यात आली. मात्र, शेतकऱ्यांना या मालाचे पैसे अद्यापही मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी ऐन पेरणीच्या तोंडावर चांगलाच अडचणीत सापडला आहे. आर्णी, महागाव, पांढरकवडा, वणी, मुकुटबन या खर्डी केंद्रावर 14 हजार क्विंटल पेक्षा जास्त मालाची खरेदी करण्यात आली. या मालाची किंमत 6 कोटी रुपायांपेक्षा जास्त आहे. जिल्ह्यातील दारव्हा या खरेदी केंद्रावरील शेतकऱ्यांना चुकारे देण्यात आले. उर्वरित म्हणजे 6 कोटी 28 लाख रुपयांचे चुकारे अद्यापही बाकी आहे.
त्यामुळे शेतकऱ्याला बियाणे खत विकत घेण्यासाठी लागणाऱ्या पैशासाठी भटकावे लागत आहे. एकंदरीत पैसे हातात नसल्याने शेतकरी हवालदिल झाला असून पैशासाठी सावकाराचे दार ठोठावण्याची वेळ येऊन ठेपली आहे.