यवतमाळ - जिल्हाधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप करत वैद्यकीय राजपत्रित अधिकारी संघटनेने मागील चार दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांची बदली केल्याशिवाय माघार नाही, असा पवित्रा संघटनेने घेतला आहे.
बुधवारी विभागीय आयुक्तांसोबतची चर्चा फिस्कटली. जिल्हाधिकाऱ्यांच्या ऐवजी मुख्य कार्यकारी अधिकारी कोविडचा आढावा घेतील, असा पर्याय समोर ठेवला होता. परंतु, संघटनेने जिल्हाधिकारी यांच्या बदलीची मागणी लावून धरली. बदलीशिवाय माघार नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. नागरिक कोविड केअर केंद्रावर तपासणीसाठी जात आहेत, मात्र कोविड तपासणी होत नाही. आतापर्यंत डॉक्टरांच्या आंदोलनाला 33 संघटनांनी पाठिंबा दिला आहे. तर ग्रामीण भागातील कोविड यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे.
हेही वाचा - डॉक्टरांचे कामबंद आंदोलन: यवतमाळमधील आरोग्य यंत्रणा कोलमडली
जिल्ह्यात डॉक्टर आणि कर्मचारीही पॉझिटिव्ह सापडत आहेत. त्यांच्यासाठी कुठे बेड मिळू शकते का, याबाबत विचारणा करण्यासाठी गेलो होतो. मात्र, अपमानास्पद वागणूक देण्यात आली असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विजय अकोलकर यांनी सांगितले. आमच्या आंदोलनामुळे रुग्णांची गैरसोय होत नसून अत्यावश्यक सेवा सुरू आहे. तसेच या आंदोलनात कुठल्याही प्रकारचे राजकारण नसल्याचेही स्पष्ट केले. जिल्हाधिकाऱ्यांची बदली झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा पवित्रा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घेतला आहे.
हेही वाचा - आरोग्य अधिकारी व डॉक्टर कामबंद आंदोलनावर ठाम, आयुक्तांशी चर्चा ठरली निष्फळ