यवतमाळ - आर्णी तालुक्यातील कोळवण येथे (दि.19) पहाटे साधरणत: 3.30 ते 4 वाजताच्या दरम्यान बस आणि टिप्परचा अपघात झाला. यात चार जण ठार तर 28 जण जखमी झाले आहेत. जखमींना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन अपघातग्रस्त रुग्णांनी भेट घेतली.
तुम्ही कुठे राहता, सोलापूरला कामाकरिता केव्हा गेले होते. तुमचा परिवार कुठे राहतो, आदी बाबींची पालकमंत्र्यांनी अतिशय आस्थेने विचारपूस केली. तसेच सर्वांना येथून बरे करूनच पाठवू. तुम्ही चिंता करू नका. येथील प्रशासन तुमची काळजी घेईल. तसेच बरे झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या राज्यात रेल्वेने पाठविण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी किरकोळ जखमींना भरती केलेल्या वॉर्डात तसेच गंभीर जखमी असलेल्या अतिदक्षता वॉर्डात जाऊन अपघातग्रस्त रुग्णांची पाहणी केली.
या बसमध्ये दोन चालक व 30 प्रवासी असे एकूण 32 जण होते. यात झारखंडचे 19 जण, छत्तीसगडचे 8 आणि मध्यप्रदेशच्या 3 जणांचा समावेश होता. अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले असून 22 जण किरकोळ जखमी आहेत. यावेळी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर.पी.सिंह, विभागप्रमुख डॉ. मिलिंद कांबळे, उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी बावीस्कर उपस्थित होते.