यवतमाळ - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या नियंत्रणात आणणे व मृत्युदर कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी एकाच दिवशी पाच तालुक्यांचा दौरा करत कोविड केअर सेंटरची आकस्मिक तपासणी केली. यावेळी या केंद्रावरील अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. सोबतच यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी बधितांचा आकडा कमी करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या आहेत.
'चाचण्यांचे प्रमाण वाढवा, मृत्युदर कमी करा'
जिल्ह्यातील कळंब, राळेगाव, वणी, पांढरकवडा आणि घाटंजी येथे जिल्हाधिकाऱ्यांनी कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटर, ग्रामीण रुग्णालय आदींना भेटी देऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांची पाहणी केली. तसेच बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेऊन चाचणी करणे, चाचण्यांचे प्रमाण वाढविणे, मृत्युदर शुन्यावर आणण्यासाठी गांभीर्याने नियोजन करणे, लक्षणे आढळताच संबंधितांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करणे, तसेच गृहविलगीकरणात असलेल्यांवर नियमितपणे लक्ष ठेवणे,आदी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच प्रत्येक तालुक्यातील जास्तीत जास्त पात्र नागरिकांचे लसीकरण त्वरीत करून घेण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करा. 1 मे पासून 18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरूवात होणार आहे, त्यादृष्टीने आतापासून नियोजन करा, असे निर्देशही यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहे.