यवतमाळ - जिल्ह्यातील अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी मागील अनेक वर्षांपासून असलेल्या प्रलंबित मागण्यासाठी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन केले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकिय कर्मचारी हा दर्जा देऊन सेविकांना तृतीय व मदतनिसांना चतुर्थ श्रेणीचे वेतन द्यावे, अशा काही प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या काही प्रमुख मागण्या ;
- अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकिय कर्मचारीचा दर्जा द्यावा
- सेविकांना तृतीय व मदतनिसांना चतुर्थ श्रेणीचे वेतन, भत्ते, सेवेचे फायदे तसेच महिन्याला किमान वेतन देण्यात यावे
- सप्टेंबर २०१८ पासून मध्यवर्ती सरकारची मानधनवाढीची रक्कम फरकासहित देण्यात यावी
- सेवानिवृत्तीच्या वेळी मिळत असलेल्या मानधनाची ५० टक्के रक्कम पेंशन म्हणून देण्यात यावी
- जुन महिन्याच्या मानधनाची रक्कम अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देऊन त्यांची व त्यांच्या कुटूंबीयांची होत असलेली उपासमार थांबविण्यात यावी
अंगणवाडी सेविकांकडून नरेंद्र-देवेंद्र हाय हायच्या घोषणा
आंदोलना दरम्यान अंगणवाडी सेविकांकडून नरेंद्र-देवेंद्र हाय हायच्या घोषणा देण्यात आल्या. वरिल मागण्यांप्रमाणेच इतर काही मागण्यांसाठी जुलै महिन्या पासूनच अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन किंवा मासिक अहवाल पाठवणे बंद केले आहे. या आंदोलनात महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष उषा डंभारे, विजया सांगळे, मनीषा केळकर, अनिता कुलकर्णी, गुलाबराव अमृतकर यांच्यासह जिल्हाभरातील अंगणवाडी सेविका, मदतनीस मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.