यवतमाळ - कोरोना व्हायरसच्या दहशतीने जगातील अनेक व्यवहार ठप्प केले आहे, तिथे महाराष्ट्रातील लग्नाचे मुहूर्त कसे सुटतील. राज्यातील अनेक लग्नाळूंना त्यांचे लग्न पुढे ढकलण्याची वेळ आली आहे. मात्र यवतमाळच्या एका युवतीने कोरोनामुळे दोनवेळा लग्न पुढे ढकलले गेल्यानंतर दुचाकीवरुन थेट नवऱ्या मुलाचे घर गाठून तिथेच लग्न थाटले आहे. या लग्नाला ना वऱ्हाडी, ना वधूचे आई वडील उपस्थित होते.
दोनवेळा हुकला लग्नाचा मुहूर्त
यवतमाळ शहरातील संकटमोचन परिसरात राहणाऱ्या सुकेशनी दडांजे या मुलीचा विवाह बाबुळगाव तालुक्यातील अंतरगाव येथील प्रवीण भणारकर या तरुणासोबत 9 मार्चला ठरला होता. मुला-मुलीकडच्या मंडळींनी जोरदार तयारी केली. लग्नपत्रिका छापल्या, दरम्यान कोरोनाचा विळखा वाढतात चालला असल्याचे लक्षात आल्याने अशा परिस्थितीत कोणाला कोरोना संसर्ग होऊ नये, म्हणून दोन्हीकडच्या मंडळींनी समंजस भूमिकेतून 9 मार्च या तारखेचा विवाह पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. पुढे कोरोना संसर्ग कमी होईल, अशी आशा करून तो विवाह 31 मार्चला करण्याचे ठरवले. मात्र, दुसऱ्या वेळी सुध्दा नियोजित विवाह कोरोनामुळे झाला नाही.
आता कोरोनामुळे सर्वत्र संचारबंदी लागल्याने लग्नकार्य कसे करायचे? या विचारात दोन्हीकडील मंडळी पडली. आता वारंवार विवाह पुढे ढकलणे योग्य नाही. त्यामुळे आता पाहुणे मंडळी जमली नाही, तरी चालेल 3-4 लोकांच्या उपस्थितीत विवाह करण्याचे ठरवले. त्यासाठी मुलीला सासरी घेऊन जाऊन पोहचविण्यासाठी मुलीकडच्या मंडळींनी प्रशासनाला कारची परवानगी मागितली. ती वेळेपर्यंत मिळाली नाही. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये काय करावे? असा प्रश्न उपस्थित झाला.
कार मिळाली नाही, दुचाकीवरुन गाठले भावी सासर
मुलीच्या माहेरच्यांनी मुलीला मेंदी लावली होतीच. मग काय नववधूने दुचाकीने थेट तिचं सासर असलेले ( 20 किलोमीटर) बाभूळगाव तालुक्यातील अंतरगाव गाठलं. त्यानंतर आज दुपारी या दोघांचा विवाह मोजक्या 4 लोकांच्या उपस्थितीत पार पडला. नवरदेवाच्या घरीच अंतरपाट धरून लग्न झाले. यावेळी मुलीचे आईवडील मुलीसोबत लग्नवेळी सुद्धा नव्हते. त्यामुळे कोरोना आणि संचारबंदीमुळे असा विवाह करण्याची वेळ या नवं दाम्पत्यावर आली.