यवतमाळ- कोरोना काळात जिल्ह्यातील शेतकरी विविध समस्येने त्रस्त आहेत. बोगस बियाणे, खतांचा तुटवडा, वाढलेला उत्पादन खर्च त्यातच कर्जमाफी न झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक ओढाताण होत आहे. या कारणाने शेतकरी पूर्णत: हवालदिल झाले आहेत. मात्र, शासनाकडून कोणत्याही प्रकारची ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. त्यामुळे, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी घाटंजी तहसील कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने चटणी-भाकर आंदोलन करण्यात आले.
सघंपाल काबंळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले असून, मागण्यांमध्ये घाटंजी तालुक्यात पिकांची ६५ टक्के असलेली आणेवारी रद्द करून ती ५० टक्क्यांच्या खाली आणावी, सीसीआयची कापूस खरेदी २५ तारखेच्या आत चालू करण्यात यावी, जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, वन्यप्राण्यांपासून शेतीला झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने मिळावी, कोरोना काळातील वीजबिल माफ करण्यात यावे, शेतकऱ्यांचा माल जर कोणी कमी भावात खरेदी केला, तर त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार पूजा माटोडे यांना देण्यात आले.
हेही वाचा- गरजुंसाठी ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था; पांढरकवडा शहरात व्यापारी संघटनेचा पुढाकार