यवतमाळ - लसीकरण मोहिमेंतर्गत 45 वर्षांवरील बहुतांश नागरिकांचा दुसरा डोस घेणे बाकी आहे. त्यामुळे यापुढे आता प्रत्येक केंद्रावर केवळ दुसऱ्या डोसचेच लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा टास्क फोर्सच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या लसींचा दुसरा डोस नागरिकांना देण्याच्या स्पष्ट सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. पहिला डोस घेतलेल्या व दुसऱ्या डोससाठी पात्र असलेल्या नागरिकांची केंद्रनिहाय संख्या तयार करून त्या केंद्रावर दुसऱ्या डोससाठी लस प्राप्त होईल, याचे नियोजन आरोग्य विभागाने करावे. तसेच शासनाच्या सुचनेनुसार पुढील आदेशापर्यंत 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण थांबविण्यात येईल. लसीकरण केंद्रावर टोकन पद्धत परिणामकारक पद्धतीने राबवावी. जेणेकरून गर्दी होणार नाही व नियमांचे पालन करून लसीकरण सुरळीत राहील.
आतापर्यंत तीन लाखांवर नागरिकांचे लसीकरण
उपलब्ध होणाऱ्या लसीचा उपयोग हा दुसऱ्या डोससाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी चिंता करू नये तसेच यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 3 लाख 18 हजार 516 जणांचे लसीकरण झाले असून मंगळवारी (दि. 11 मे) 19 हजार 487 जणांना लस देण्यात आली. बुधवारी (दि.12 मे) जिल्ह्याला 12 हजार 500 लस मिळाल्या. जिल्ह्याला लसींचा साठा उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा सुरू असून यापुढे गतीने लसीकरण करण्यात येणार आहे.
हेही वाचा - मुख्यधिकाऱ्यांनी नियम मोडणाऱ्या किराणा दुकानदारास ठोठावला वीस हजारांचा दंड