यवतमाळ - जिल्ह्यात पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे उगवलेल्या पिकांना खतांचा फवारा देणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ सध्या प्रत्येक कृषी केंद्रावर युरिया, डीएपी व इत्यादी खते घेण्यासाठी होत असल्याचे दिसते. मागील तीन महिन्यापासून पिकाच्या वाढीसाठी शेतकऱ्यांना युरियाची नितांत गरज आहेत. ज्या शेतकऱ्यांना चार पोते युरिया खत पाहिजे त्यांना केवळ एक पोते खत मिळत आहे. जिल्ह्यात सर्वत्र अशीच परिस्थिती निर्माण झाली आहेत.
यवतमाळ तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशातच युरिया खतासाठी शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. युरियासाठी शेतकऱ्यांनी कृषी केंद्रासमोर अक्षरशः रांगा लावल्या आहेत. फुलसावंगी गावातील कृषी केंद्रामध्ये युरिया आल्याची माहिती मिळताच शेतकऱ्यांनी सदर ठिकाणी मोठी गर्दी केली. यावेळी काही ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा लावण्याची वेळ आली. मात्र, त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे.
हेही वाचा - 'भाभीजी पापड' खाल्ल्याने होत नाही कोरोना; राजस्थानच्या मंत्र्यांचा अजब दावा..
युरिया खताच्या तुटवड्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्याना इतरत्र खतासाठी जावे लागत आहे. सध्या यवतमाळ जिल्ह्यात 8 हजार मेट्रिक टन युरियाचा तुटवडा आहे. युरिया आल्याची माहिती मिळताच शेतकरी सकाळपासूनच कृषी केंद्रांसमोर रांगा लावतात. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे शेतकऱ्यांनी लांबच लांब रांगा पाहावयास मिळाल्या. कित्येक शेतकऱ्यांनी तोंडाला मास्क लावलेच नव्हते. अगोदरच यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
शेतकऱ्यांना पिकांवर खतांची फवारणी करण्यासाछी आवश्यक युरिया मिळवण्यासाठी सध्या भटकंती करावी लागत आहे. युरिया अभावी पिकाची वाढ खुंटण्याची चिन्हे आहेत. युरिया मिळावा यासाठी शेतकरी तासंतास रांगेत उभे राहतात. चार पोत्यांची आवश्यकता असताना एक पोते कृषी केंद्र चालंकाकडून देण्यात येत आहे. पेरणी केल्यापासून शेतकऱ्यांना युरिया मिळाला नाही. त्यात आता रांगेत उभे राहिल्यावर अवघे एक पोते युरिया देऊन बोळवण केली जात आहे.
याबाबत जिल्हा कृषी अधिकाऱ्यांसोबत बातचित केली असता त्यांनी, यवतमाळ जिल्ह्यात 14 हजार 900मेट्रीक टन युरिया उपलब्ध झाला होता. आता अडीज हजार टन युरिया आला आहे. पुढील आठवड्यात पुन्हा युरिया उपलब्ध होईल. त्यानंतर कोणत्याही प्रकारची टंचाई भासणार नसल्याचे सांगितले.