यवतमाळ - पुसद तालुक्यातील गौळ बुद्रुक, शेंबाळ पिंपरी, जगापूर परिसरात धुवाधार अवकाळी पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच ढगाळ वातावरणासोबतच गारवा ही वाढला होता. मुसळधार पावसामुळे पाण्याचे लोट वाहत होते. मात्र, अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.
उसाला जोरधार फटका-
आधीच परतीच्या पावसाने आणि पैंनगंगेच्या सततच्या पुराच्या पाण्याने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाल आहे. या अवकाळी पावसाने ऊसाचा पट्टा म्हणून ओळख असलेल्या गौळ बुद्रुक, जगापूर, शेंबाळ पिंपरीला चांगलाच तडाखा बसणार आहे. या भागात ऊस तोडणीची लगबग सुरू आहे. तर अनेकांच्या शेतात ऊस तोडून झालेला आहे. या मुसळधार पावसाने ऊस वाहतूक अडचणीची ठरणार आहे. शिवाय काही दिवस ऊस तोडणी ही बंद राहणार आहे. तसेच तोडून टाकलेला ऊस शेतातच वाळून हलका होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. अचानक आलेल्या या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांना आर्थिक संकटालाही सामोरे जावे लागणार आहे.
हेही वाचा- कोरोना वाढतोय... शाळा सुरू करण्याचा निर्णय विचारपूर्वक घ्या - देवेंद्र फडणवीस